
सामना प्रतिनिधी। वसई
स्त्री म्हणजे नाजूक… कोमल… पण आज नाजुकतेची व्याख्या बदलत अनेक महिला पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रांमध्ये भीमपराक्रम गाजवत आहेत. अगदी बॉडीबिल्डिंग हे क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही, पण लग्नानंतर तेही दोन मुलांच्या जन्मानंतर आणि चक्क वयाच्या चाळिशीत शरीरसौष्ठव स्पर्धेत स्वतःची पॉवर सिद्ध करण्याचे यशस्वी धाडस विरारच्या श्रद्धा ढोके यांनी करून दाखवले आहे.
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेपासून ते महाराष्ट्र श्री, मुंबई श्रीसारख्या अनेक स्पर्धांमध्ये यशाची शिखरे पार करत आता पॉवरफुल्ल श्रद्धाने चेन्नई येथे होणाऱया राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भरारी घेतली आहे. पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये आपण नक्कीच स्थान मिळवू हा आत्मविश्वास त्यांना आहे. मात्र त्यासाठी हवा आहे केवळ आर्थिक मदतीचा हात.
मूळच्या नगर येथील श्रद्धा ढोके यांचा 2004 ला विवाह झाला. लग्नानंतर पहिल्याच बाळंतपणात त्यांचे वजन 65 किलोवरून 96 किलोपर्यंत वाढले. त्यानंतर 2012 ला दुसऱया मुलाच्या जन्मानंतर वजन तब्बल 110 किलोपर्यंत वाढले. जीममध्ये मेहनत घेत त्यांनी आपले वजन 48 किलोपर्यंत आणले. याचदरम्यान त्यांनी जीम ट्रेनरसाठी के इलेव्हनमधून कोर्स केला. आपल्या वजनाच्या तिप्पट वजन आपण उचलू शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम घाटकोपर येथे 22 मे 2017 ला भरविण्यात आलेल्या महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला. पहिल्याच स्पर्धेत 4 गोल्ड मेडल घेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांना गौरविण्यात आले. तेथे त्यांची महाराष्ट्रासाठी निवड झाली आणि कोल्हापूर येथे महाराष्ट्र स्पर्धेत खेळत त्यात रौप्यपदकही मिळवले. डिसेंबर 2018 ला जमशेदपूर येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत 4 सुवर्णपदके मिळवत चॅम्पियनशिप मिळवली. याच दरम्यान त्यांनी पॉवरलिफ्टिंगमधून बॉडीबिल्डिंगकडे वळायचे ठरवले. तीन महिन्यांच्या कसून व्यायामानंतर त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी मुंबई श्री स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. 6 मार्चला महाराष्ट्र श्री स्पर्धेत कास्यपदक मिळवत पंचांचीही वाहवा मिळवली. कोच आदित्य झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 30 सुवर्णपदके व 5 वेळा बलवान महिला असल्याचा गौरव मिळवला आहे. आता त्यांची 29 व 30 मार्च 2019 रोजी चेन्नई येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दृष्टिकोन बदलला पाहिजे
आपल्या देशात खेळापेक्षा महिलेने काय कपडे घातले आहे याविषयी जास्त चर्चा होते. त्यामुळे अजूनही या क्षेत्राकडे महिला फार कमी वळत आहेत हे दुर्दैव. अशी खंत श्रद्धा ढोके यांनी व्यक्त केली .
पालिकेला आवाहन
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विरारचे नाव गाजवून मराठी पताका विरारच्या धरतीवर फडकवणार हा विश्वास श्रद्धाला आहे. मात्र स्पर्धेसाठी पैशांची गरज असून घरची परिस्थिती बेताची असून बॉडीबिल्डिंगसाठी दागिनेही त्यांनी विकले आहेत. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी त्यांनी विरार पालिकेला साकडे घातले आहे.





























































