‘बिबिगो’कर्ते वसंत जोशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

रायगड जिह्यातील कर्जत येथे राहणारे साहित्यिक वसंत जोशी यांचे निधन झाले ही बातमी कळली तेव्हा एक जण म्हणाला, “म्हणजे वडा प्रसिद्ध कर्जत ना?” त्यांचं साहित्यिक म्हणून नाव कसं माहीत नाही? वसंत जोशी 12 मे 2023 रोजी गेले तेव्हा त्यांचे वय 93 होते. रसिकांच्या मनात वसंत जोशी म्हणजे ‘बिबिगो सांगणारे’ अशी त्यांची ओळख लक्षात आहे. बिबिगो म्हणजे बिनबियाच्या गोष्टी. लोकप्रिय लेखकांच्या आंबट-तुरट, पण वास्तवाला धरून कल्पनारम्य गोष्टी जोशींनी सांगितल्या. त्यात वि. आ. बुवा, पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, दिलीप पुरुषोत्तम चित्रेंपर्यंत अनेकांचा समावेश होता.

या गोष्टींत लेखकांचे विशिष्ट स्वभाव आणि त्यांच्या हकिकती वसंत जोशी यांनी मिश्कीलपणे मांडल्या. विविध वर्तमानपत्रांतून, साप्ताहिकांतून त्यांचे लेखन येत गेले. त्यांच्या या लेखांचे पुस्तक निघाले आहे. त्याची पण गमतीशीर गोष्ट आहे. लेखांचे हे बाड कोल्हापूरच्या श्रीराम पचिंद्रेंकडे होते. त्यांनी ते पुण्याच्या अनुबंध प्रकाशनाच्या अनिल कुलकर्णी यांच्याकडे पाठवून दिले. त्यांनी या गोष्टी तीन भागांत प्रकाशित करायचे ठरवले. हास्यरंग, हास्यकल्लोळ आणि हास्य जल्लोष हे ते तीन संग्रह. सगळय़ा गोष्टी झाल्या, पण अडले ते ह. मो. मराठे यांच्या प्रस्तावनेसाठी. तेव्हा लेखक, प्रकाशक मराठेंकडे गेले. तेव्हा मराठे यांच्या लक्षात आले की, या लेखांची प्रुफं त्यांनी पाठकोरे कागद म्हणून वापरले होते. शेवटी प्रकाशकाला परत प्रुफं काढायला लागली आणि एकदाची प्रस्तावना मिळाली! तीन पुस्तके रीतसर प्रकाशित झाली, पण या गोष्टीला आणखी एक वळण लागायचे होते. या पुस्तकाला मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा जयवंत दळवी पुरस्कार दिला गेला. या पुरस्कार सोहळ्यात वसंत जोशी यांनी खरा धक्का fिदला. आपल्या सत्काराला उत्तर म्हणून भाषण करताना ते सुरुवातीलाच म्हणाले, “या पुरस्काराचे श्रेय रविप्रकाश कुलकर्णी यांना आहे.” अर्थात त्यामुळे अख्खे सभागृह माझ्याकडे वळून पाहू लागले. जयवंत दळवी पुरस्काराला आपण पुस्तके पाठवावी की न पाठवावी, याचा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला होता. याबाबतीत ते काथ्याकूट करू लागले तेव्हा त्यांना मी म्हटले, “जोशीबुवा, तुम्ही पाठवून तर द्या. फार फार तर काय होईल, तुमची एक प्रत वाया गेली. कदाचित तुम्हाला पुरस्कारही मिळू शकतो.” ही सगळी कहाणी त्यांनी भर कार्पामात सांगितली हा त्यांचा मोठेपणा.

वसंत जोशी मूळचे जमखंडीचे, तेथून ते बाळासाहेब खरडेकरांच्या कागल येथील कॉलेजात गेले. इंटर झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता पुण्याला गेले. पदवी मिळाल्यानंतर ते खादी ग्रामोद्योग मंडळात कामाला लागले. त्या वातावरणातदेखील त्यांचे साहित्यप्रेम त्यांनी टिकवले. बाळ कुडतरकर यांच्यामुळे ते रेडिओसाठी नभोनाटय़, श्रुतिका लिहू लागले. तेथे त्यांचे नाव झाले, पण कुडतरकरांनी रेडिओ सोडला. त्यामुळे जोशीदेखील तेथून बाहेर पडले. नंतर पुणे-मुंबईला जाणे जवळ पडावे म्हणून ते कर्जतला स्थायिक झाले ते शेवटपर्यंत.

त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनात घर करून आहे. त्यांचे वडील संस्कृतप्रेमी होते. त्यांच्याकडे खूप संस्कृत पुस्तके होती, पण वसंत जोशींना त्या पुस्तकांत रस नव्हता. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला या पुस्तकांचे काय करावे? विनोबा, लक्ष्मण शास्त्री जोशी यांसारख्यांना ही पुस्तके हवीत का विचारले. सगळ्यांनी नकार दिला.

शेवटी त्यांनी सगळा प्रकार वडिलांना सांगितला तेव्हा वडील म्हणाले, “पुस्तक उचला आणि नदीत टाकून द्या.” आज्ञाधारक जोशी बंधूंनी पुस्तके नदीत टाकली. मी त्यांना म्हटले की, “पुस्तके रद्दीत टाकली असती तर कुणी वाचकाने एखादे तरी पुस्तक नेले असते. एखादे पुस्तक संग्रहालयाकडे सुरक्षित राहिले असते. तुमच्या कृत्यामुळे सगळय़ाची माती झाली.” …पण वसंत जोशी शेवटपर्यंत म्हणत राहिले, “ मी वडिलांची आज्ञा पाळली.” खुद्द वसंत जोशींकडे सुंदर पुस्तकसंग्रह आहे. त्याचे आता काय होणार कुणास ठाऊक? मात्र इतके दिवस मी पुण्याला जाताना कर्जत आले की म्हणत असे, “वसंत जोशी, वृंदा निवास, स्टेशनजवळ”. आता मात्र वसंत जोशी इथे राहत होते, असे सांगून त्यांची आठवण नक्कीच जागवणार.