
सामना प्रतिनिधी। वास्को
ख्रिसमसच्या पहाटे वास्कोत चार दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे 9 लाख रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पहाटे 5.30 च्या सुमारास आग लागल्याची माहिती वास्को अग्निशामक दलाला मिळताच त्यांच्या दोन तसेच वेर्णा व एमपीटीच्या एक बंबाने घटनास्थळावर धाव घेऊन दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
वास्को शहरात असलेल्या जुन्या ‘सिनी वास्को’ इमारतीच्या मागे असलेल्या काही दुकानांना लागलेली आग दीड तासांच्या अथक परिश्रमा नंतर विझवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले. जळून खाक झालेली दुकाने श्रीकांत बोरकर, अंबिका नाईक, अमलदार सिंग व शोभा चव्हाण यांच्या मालकीची असून यात पादत्रणे, ज्युस सेंटर, पान – मसाला व केस कापण्याच्या दुकानाचा समावेश असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली.





























































