
>>बदिउज्जमा बिराजदार (साबीर सोलापुरी)
कवीचं मन एकटं कधीच नसतं. त्यात जगाच्या दुःखाची गर्दी दाटलेली असते. आतंकाचे, आकांताचे असंख्य आवाज त्याला सुखाची निंद्रा घेऊ नाही देत. भोवतालच्या दुःखाची कैफियत त्याला कधीच स्वस्थ बसून नाही देत. अस्वस्थ होणं हाच कवीचा जिवंतपणा असतो. जगाच्या दुःखाचं ओझं मनावर घेऊन कवी वेदनेच्या वाटा तुडवत निघालेला असतो. हा प्रवास बाह्यजगाच्या अत्यंस्थ कळवळ्याचा असतो. सर्वसामान्य माणसं दुःखाला प्राक्तनाचं भोग समजून दुःख गिळून जगत असतात. असं प्राक्तन परस्त होत जाणं कवीला मंजूर नसतं. अशा नैराश्यानं काळवंडलेल्या, औदासिन्यानं वेढलेल्या, दुःखानं जर्जर झालेल्या समूहमनातील भाव-भावनांचे पापुद्रे कवी कवितेतून उलगडून दाखवत असतो. नैसर्गिक जगण्याचं बळ पुरवत असतो. कवीच्या अभिव्यक्तीचं प्रकटीकरण त्याचं वैयक्तिक नसतं तर ते वैश्विक असते. हाच कवीचा अंतःस्वर असतो.
अकोल्याचे दिनेश गावंडे हे याच कोटीतले कवी आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते अखंड काव्यसाधना करीत आहेत. या सिद्धीतूनच त्यांचा ‘कंदिलाच्या लख्ख उजेडात’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालाय. त्यात वर्तमानाचं यथार्थ प्रतिबिंब पडलेलं स्पष्टपणे दिसून येतं. उद्विगनता, संताप प्रगटत न करता शांतपणे, संथपणे पण तितक्याच प्रबळपणे ते विधानांची, विचारांची मांडणी करून समाजाला अंतर्मुख व्हायला लावतात. निराशेच्या मुळाशीच आशेचे अंकुर असतात. आपण फक्त ते फुटण्याची वाट पाहायची असते. ही सबुरी त्यांच्या ठायी भरलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात…
आयुष्यात सुख-दुःख
ऊन सावलीच्या वाणी
सबुरीचा सरत्यानं
धीर पेरू भळावाणी
चोहीकडून अंधारून आलेलं असलं, आपलेपणाचा स्तोत्र आटलेला असला अन् वरून झाड ओडकं बोडकं, नग्न, भग्न दिसत असलं तरी ‘बुडाशी सळसळ हिरवीगार’ असते. त्याकडं हा कवी लक्ष वेधतो.
पाहिजे जे तुला
का नाही पेरत
मातीतून काय
नाही उगवत
पाऊस हा सृजनाचा निर्मिक असतो हे खरंच. पण त्याच्या पाठ फिरवण्यानं शेतकऱयांची किती त्रेधातिरपीट उडते. हे मांडणं शब्दांच्या पलीकडंच असतं. आजही खेडय़ापाडय़ातून त्याची दाहकता शमलेली नाही. खेडय़ातल्या दुष्काळाला, उपासमारीला, सावकाराच्या कर्जाला कंटाळून फासावर लटकलेल्या शेतकऱयाच्या पोराची किती खोलवर घुसमट होते. याचा यंत्रणेला जरीही सुगावा नाही लागत. मदतीचा चेक देण्याआधी चौकशीचा ससेमिरा किती जीवघेणा असतो. त्याच्या चारित्र्याची चिरफाड केली जाते त्याच्या निष्प्राण देहासारखीच. तेव्हा त्याचा पोरगा अंतर्बाह्य विषण्ण होऊन जातो. काळजाला पीळ पाडणारा संवाद गावंडे यांनी ‘पावसा’ या दीर्घ कवितेतून केलाय.
पावसा,
हे सावकारी कर्ज
अजगरासारखं
बापाला गिळून
पोराला मारतंय वेटोळी
कृषिप्रधान देशातलं हे आजचं भीषण वास्तव आहे.
‘हा कवी तसा नव्हता’ या शीर्षकाची कविता म्हणजे गावंडे यांच्या संवेदनशील मनाचं रुदन आहे. हा कवी इतरांपेक्षा कसं वेगळं आयुष्य जगणारा होता, त्यानं कवितेसह जगलेली, जागवलेली माणुसकी गावंडे त्यांच्या कवितेतून मुखर करतात.
हा कवी तसा नव्हता
त्याच्या जगण्याचा आरसा
अन् वारसा होती
त्याची कविता
ही कविता तमाम कवींसाठी वाचनीय आहे. कवीचं गावातील घर मातीचंच असतं ते सारवायला, दुरुस्तीला माती लागते. भिंतीचं अंतःकरण मातीच जाणून असते. परंतु आजू-बाजूच्या वाढत्या काँक्रिटीकरणामुळे गावात मातीच दुर्मिळ होत चाललीय. उन्हाळ्यात थंडावा, हिवाळ्यात उबदारपणा देणाऱया घराच्या भिंतींवर पापुद्रे वाढत चाललेत. घराची पडझड होत चालली. घर दिवसेंदिवस बोडकं होत चाललंय. एकटं पडत चाललंय. याचं शल्य कवीला अस्वस्थ करत राहतं. ‘मातीचं घर’ ही एक हृदयस्पर्शी कविता आहे.
गावातलं मातीचं घर
एकटं पडत चाललंय
अवतीभोवती उभ्या राहिलेल्या
सिमेंट काँक्रीटच्या घरांमुळे
जग कितीही पुढारलं तरी यातून स्त्रीची सुटका नाही होत. आजच्या ग्लोबल जगातलं वास्तव ‘खिळा’ या कवितेतून मांडण्यात आलंय.
आधीच ठोकलेयत
तुझ्या हाता-पायांत
नात्यांचे असंख्य खिळे
एक खिळा तर चक्क
तुझ्या मेंदूतून आरपार,
जो तू झाकलायस
लाल गडद कुंकवाखाली!
विश्वसुंदरी, अपराधी, वही, कंदिलाच्या लख्ख उजेडात, वसंतांचे सैन्य, दंगल, पिंजऱयातला पोपट आदी कविताही लक्ष वेधून घेणाऱया आहेत. या संग्रहातील काही गझला तंत्राच्या दृष्टीने सदोष असल्या तरी त्यातून अविष्कृत होणारा आशय महत्त्वाचा आहे. एकूणात दिनेश गावंडे यांनी वेदनेवर टाकलेला प्रकाशझोत दिपवणारा आहे.
कंदिलाच्या लख्ख उजेडात
कवी – दिनेश गावंडे
प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 72, मूल्य – 125 रु.























































