वीर सावरकर पूल शनिवारपासून खुला! वाहतूककोंडीतून होणार चालकांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा वीर सावरकर पूल शनिवारपासून खुला होणार आहे. यामुळे गोरेगावमधील वाहतूककोंडी फुटणार असून हजारो वाहनचालक-रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

वीर सावरकर पुलाचे उद्घाटन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी होणार होते. मात्र हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन उद्घाटन न करता सदर पूल जनतेसाठी खुला करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जाहीर केले.  दरम्यान, पत्रकार परिषद सुरू असतानाच अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाची बातमीही आली. या पार्श्वभूमीवर 18 ऑगस्ट रोजी चेंबूर येथील पालिकेकडून पूर्णबांधणी करण्यात आलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलावाचे उद्घाटन न करता सदर तलाव जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा साधना माने, कार्यकारी अभियंता सुभाष बनसोडे उपस्थित होते.

  • तीन लेन्स असणारा हा पूल 400 मीटर लांब तर5 मीटर रुंद आहे. नोव्हेंबर 2015 पासून काम सुरू असलेल्या या पुलाच्या कामासाठी 26 कोटी रुपये खर्च झाला आहे.
  • चेंबूर येथील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव पुनर्बांधणीनंतर रहिवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यासाठी 19 कोटींचा खर्च आला.