
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
धुवांधार पावसामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये घटलेली भाजीपाल्याची आवक आज अचानक वाढली. त्यामुळे ठोक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले. मात्र हा भाजीपाला किरकोळ बाजारात मोठय़ा प्रमाणात गेला नाही. सुमारे दीडशे गाडय़ांची जावक कमी झाली. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. ग्राहकांना एक किलो भाजीसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागले.
राज्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यंतरी पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱयांना आपल्या शेतातील भाजीपाला काढता आला नाही. त्यामुळे एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाली. सोमवारी मार्केटमध्ये फक्त भाजीपाल्याच्या 254 गाडय़ा होत्या. त्यानंतर दुसऱया दिवशी ही आवक जवळपास दुप्पट झाली. बुधवारी अनेक नद्यांना महापूर आल्याने हजारो ट्रक महामार्गावर अडकून पडले होते. त्यामुळे आज भाजीपाल्याची आवक एकदम कमी होईल अशी शक्यता सर्वच यंत्रणांनी व्यक्त केली होती. मात्र आज मार्केटमध्ये भाज्यांची विक्रमी आवक झाली. सुमारे 713 गाडय़ा मार्केटमध्ये आल्या. त्यामध्ये 97 ट्रक आणि 616 टेम्पोंचा समावेश आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात आवक झाली असली तरी त्या तुलनेत जावक झाली नाही. मार्केटमधून फक्त 588 टेम्पो भाजीपाला बाहेर गेला. मालाला उठाव कमी असल्यामुळे ठोक बाजारातील दर गडगडले. किरकोळ बाजारात मात्र भाजीपाला चढय़ा दराने विकला गेला.
दोन दिवस भाजीपाला काढता आला नव्हता
एपीएमसी मार्केटला ज्या भागातून भाजीपाला येतो त्या भागात गेले दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल काढता आला नाही. आता थोडा पाऊस कमी झाल्याने मार्केटमध्ये मालाची आवक आज वाढली. यापुढेही तीन-चार दिवस ही आवक अशीच राहणार आहे, असे मत भाजीपाला व्यापारी रामदास पवळे यांनी व्यक्त केले आहे.





























































