
दरवर्षी हिवाळ्यात प्रचंड आवकेमुळे भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असतात. यंदा मात्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने उत्पादनात घट येऊन भाज्या चांगल्याच महागल्या आहेत. नाशिक बाजार समितीत शुक्रवारी मटार 200, वांगी 120 रुपये किलो, तर कोथिंबीर जुडीचा कमाल भावही 120 वर पोहोचला होता. किरकोळ बाजारातून गावठी कोथिंबीर तर दिसेनाशीच झाली असून इतर भाज्यांचे दरही शंभर ते दीडशे रुपयांच्या घरात आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता, त्याने भाज्यांची दाणादाण केली. शेतातच पालेभाज्या, फळभाज्या सडल्या आहेत. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, नाशिक पृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या भाज्यांची आवक घटली आहे.
या समितीत मागील आठवडय़ात 7 नोव्हेंबरला फळभाज्यांची आवक 6006 क्विंटल होती, ती आता 4 हजार 888 इतकीच आली. कोथिंबिरीचा कमाल भाव शुक्रवारी 120 पुकारला गेला. मेथी 48, शेपू 63, कांदापात 44 असे प्रति जुडी दर होते.

























































