किचनमध्ये ‘कडधान्या’ला फोडणी, ठाण्यात भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हप्ते घेऊन बेकायदा ठाण मांडलेल्या फेरीवाल्यांचे कायमचे बस्तान बसवण्याचा डाव आखण्यात आला असून याविरोधात ठाण्यातील भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या आंदोलनात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी विक्रेता संघ व जिजामाता भाजी फळ सेवा संघाच्या जवळपास साडेतीनशेहून अधिक विक्रेत्यांनी सहभाग घेतल्याने आज पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. त्यामुळे ठाणेकरांना कुठेही भाजीपाला मिळाला नाही. त्यातच शनिवार असल्याने घराघरात कडधान्यांनाच फोडणी देऊन दिवस ढकलावा लागला. दरम्यान, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विक्रेत्यांनी दिल्याने खवय्यांचे भाजीचे वांदे होणार आहेत.

जांभळी नाक्यावर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून भाजी आणि फळ विक्रेते होलसेल दरात आपला व्यवसाय करत आहेत. मात्र पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत मंडईबाहेरील रस्त्यावर अनधिकृत किक्रेते बसतात. त्यांच्याबाबत वारंवार तक्रार करून कोणतीही कारवाई, हप्ते वसुली सुरू असल्यानेच होत नाही. पोलीस, महापालिका अधिकारी, कर्मचारी मूग गिळून गप्प असल्याचा आरोप होत असून काढत्या अनधिकृत किक्रेत्यांमुळे अधिकृत विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. याच्या निषेधार्थ शनिवारपासून 300 ते 350 किक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. याचदरम्यान त्यांनी निर्दशने करून जाहीर निषेध नोंदवला.

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलन करण्याची केळ आली आहे, असा संताप शिवाजी फळ विक्रेता संघाचे अध्यक्ष श्याम म्हात्रे, शिवाजी भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष अंकुश ठोंबे, जिजामाता फळ-भाजी सेवा संघाचे सुभाष ठोंबरे तसेच महिला विक्रेते अनिता जाधव यांनी व्यक्त केला आहे.