घनकचरा व्यवस्थापनात वेंगुर्ला नगर परिषदेचा पहिला नंबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वेंगुर्ले

नवी दिल्ली येथील गुलमोहर हॉलमध्ये सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एनव्हार्यन्मेंट या राष्ट्रीय संस्थेमार्फत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील वीस नगर परिषदांची स्वच्छतेबाबत सादरीकरणासाठी निवड केली होती. या वीस नगर परिषदांमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन सादर करणाऱ्या वेंगुर्ले नगर परिषदेने सर्वात जास्त गुण मिळवित देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. हा पुरस्कार वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे व तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वीकारला.

घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निवड केलेल्या देशातील एकूण वीस नगर परिषदांमधून वेंगुर्ले नगर परिषदेने सर्वाधिक ९१ गुण पटकावत प्रथम क्रमांक मिळविला, तर पाचगणी नगर परिषदेला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. स्वच्छतेच्या ‘वेंगुर्ले पॅटर्न’चे सादरीकरण सीएसईचे उप महा व्यवस्थापक चंद्रभूषण व छत्तीसगडचे अतिरिक्त आयुक्त रितू सेन यांच्यासमोर झाले. या पुरस्काराचे वितरण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष परिहार यांच्या हस्ते, चंद्रभूषण व रितू सेन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पुरस्काराबद्दल वेंगुर्ले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नागरिक यांचे वैभव साबळे यांनी अभिनंदन केले.

राज्यानंतर देशातही उमटवली मोहोर
शहरात प्लॅस्टिकबंदी व कचरामुक्त शहर या संकल्पना राबविण्यासाठी नागरिकांचा चांगला सहभाग लाभला, यामुळे हे शक्य झाले असून सर्वांच्या सहकार्याने २०१५ मध्ये राज्यात वेंगुर्ले नगर परिषद प्रथम क्रमांक आल्यावर ही नगर परिषद देशात प्रथम येईल असे म्हटले होते, ते आज साध्य झाल्याची प्रतिक्रिया माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली. २०१५ पासून सुरुवात झालेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नगराध्यक्ष राजन गिरप, नगरसेवक, मुख्याधिकारी वैभव साबळे, सर्व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी सातत्य ठेवत उत्स्फूर्त सहभाग घेतला.