
राज्यात व्हर्टिकल विद्यापीठ (Vertical University) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबई, ठाणे महापालिका अंतर्गत हे विद्यापीठ उभे राहणार आहे. या विद्यापीठाच्या कॅम्पससाठी जागेचे निकष जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार या विद्यापीठासाठी किमान 15,000 चौरस मीटर बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत उभारावी लागणार आहे. तसेच विद्यापीठासाठी इतर निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यात व्हर्टिकल विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती
राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना वर्ष 2013 मध्ये जारी करण्यात आल्या होत्या. मात्र मुंबई शहर जिह्यात स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नव्हती त्यामुळे राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 2015 मध्ये द्विसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व तेलअविव या शहरांमध्ये व्हर्टिकल विद्यापीठ उभारण्यात आलेले आहेत त्याच धर्तीवर मुंबईतही व्हर्टिकल विद्यापीठाला परवानगी द्यावी, अशी शिफारस केली होती.
बोंगीरवार समितीने सुचविल्यानुसार व्हर्टिकल विद्यापीठाबाबत सखोल अभ्यास करून राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यासाठी 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये जयंत बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे तसेच त्यानुषंगाने मागविण्यात आलेल्या सूचना व हरकती विचारात घेऊन व्हर्टिकल विद्यापीठाच्या स्थापनेसाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत.
व्हर्टिकल विद्यापीठासाठीचे निकष –
किमान 15 हजार चौरस मीटर बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत.
उपलब्ध जमीन व बांधकाम यांचे प्रमाण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या तरतुदीनुसार हवे.
सदर इमारतीमध्ये कोणतेही व्यावसायिक भागधारक नसावा.
विद्यार्थी संख्या वाढल्यास वाढीव बांधकामासाठी वाव असावा.
वर्गखोल्या, इतर सोयीसुविधा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे असाव्यात.
नॅकची 3.25 ग्रेड पॉइंट किंवा समकक्ष एनबीए किंवा एनआयआरएफ यामध्ये पहिल्या 200 मध्ये आलेले प्रायोजक मंडळ अर्ज करण्यास पात्र राहतील.
जवळच्या परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची सोय असावी.
किमान 40 टक्के क्षेत्र खेळाचे मैदानासाठी राखीव ठेवणे बंधनकारक राहील.



























































