ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

गेला बराच काळ ते आजारी होते. खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनय केला. त्यांच्या नाटकांतील भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती लाभली. 1978मध्ये बंदिवान मी या संसारी या चित्रपटातून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. यापैकी ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन या त्यांच्या नाटकांनाही प्रेक्षकांचं उदंड प्रेम लाभलं. छोट्या पडद्यावरही त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. दूरदर्शनवरील दामिनी या मालिकेतही ते झळकले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी खर्शीकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या