
बॉलिवूडचे जम्पिंग जॅक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जितेंद्र हे पक्के मुंबईकर आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये अमाप यश आणि लोकप्रियता मिळवूनही त्यांचं मराठी भाषा आणि मराठी उत्सवांवरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. याचा प्रत्यय नुकताच एका व्हिडीओमधून आला आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्र आपल्या गिरगावातल्या दहिहंडी – गणेशोत्सवाच्या आठवणी जागवल्या. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मराठी भाषेत संवाद साधला.
माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या एका छोटेखानी मुलाखतीत ते बोलत होते. यंदाचा दहिहंडी आणि गणेशोत्सवाचा बेत काय या प्रश्नावर ते म्हणाले की, मी पूर्वी गिरगावात राहायचो. तिथे दहिहंडी आणि गणेशोत्सवाची धमाल असायची. मीही त्या उत्सवात सहभागी व्हायचो. पण, यंदा मात्र मी तिथे जाणार नाही. कारण, ज्या जुन्या इमारतीत मी राहायचो, तिचा आता पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे ती इमारत आता पाडली आहे. त्या इमारतीसोबत माझ्या गिरगावातील अनेक आठवणी पुसल्या गेल्या आहेत, असं जितेंद्र यावेळी म्हणाले.