मराठमोळा, रांगडा ‘सरपंच’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झुपकेदार मिशा… आवाजातील जरब… आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने गावरान सरपंचापासून ते न्यायाधीशा पर्यंतची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या एक्झिटमुळे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात 75 वर्षे योगदान देणारा ऋषितुल्य अभिनेता हरपला आहे. रवी पटवर्धन यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

रवी पटवर्धन  यांच्या मागे पत्नी नीता, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. रविवारी दुपारी निवडक चाहत्यांच्या उपस्थित पटवर्धन यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. छातीत दुखू लागल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

 दीडशे नाटके, दोनशे चित्रपट

वयाच्या सातव्या वर्षापासून पटवर्धन यांनी मराठी रंगभूमीवर एन्ट्री घेतली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते या रंगभूमीशी एकनिष्ठ राहिले. छोटा पडदा असो की मोठा रंगभूमीवरचा सेट असो की, कोणताही जाहीर कार्यक्रम पटवर्धन यांची रसिकांवर वेगळीच छाप पडायची. दीडशेहून अधिक नाटके तसेच दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. दूरदर्शन वरील आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात देखील त्यांनी स्वतःचे वेगळेपण दाखवले. ‘अग्गबाई …सासूबाई’ या मालिकेतील त्यांच्या आजोबांच्या भूमिकेमुळे रवी पटवर्धन हे घराघरात पोहोचले होते.

 82व्या वर्षी धृतराष्ट्र साकारला

पटवर्धन यांनी आपल्या भारदस्त देहयष्टीमुळे खलनायकाची भूमिका हुबेहूब बजावली. सरपंच असो की राजकीय पुढारी त्यांनी आपल्यातील नटाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका ही जिवंत वाटायची. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयाच्या 82 व्या वर्षी देखील त्यांनी ‘आरण्यक’ या नाटकात धृतराष्ट्राची बजावलेली भूमिका एक चमत्कारच ठरला आहे. रवी पटवर्धन यांनी अंकुश, प्रतिघात, तेजाब या हिंदी चित्रपटांमधील तसेच सिंहासन, उंबरठा अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.

बीबीसीने घेतली दखल

एकेकाळी घराघरात पोहोचलेल्या मराठी दूरदर्शन वरील ‘आमची माती आमची माणसं’ या शेतीविषयक कार्यक्रमाची दखल बीबीसीने देखील घेतली होती. त्यांच्या कार्याचा राज्य सरकारने दोनच वर्षांपूर्वी विशेष पुरस्कार देऊन सत्कार केला होता. पटवर्धन यांच्या निधनामुळे त्यांच्या रसिक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.