
बॉलिवूडमधील आठ तासाच्या शिफ्टबद्दल आता अनेकजण खुलेपणाने बोलू लागले आहेत. आठ तासाच्या शिफ्टबद्दल सर्वात आधी दीपिका पादुकोणने आवाज उठवला होता. स्पिरीट या चित्रपटामधील कामाच्या वेळेवरुन वाद झाल्यानंतर, तिला चित्रपटामधून काढून टाकण्यात आले होते. तिथून खऱ्या अर्थाने बाॅलीवूडमधील आठ तासांचे काम हा विषय चर्चेत आला. त्यानंतर दीपिकाला दिग्दर्शक अनुराग बासू यांनीही आठ तासांच्या शिफ्टबद्दल पाठींबा दिला. आता दीपिकाला सुप्रिया पाठक यांनी देखील आठ तासांच्या शिफ्टसाठी सहमती दर्शवली आहे.
चित्रपटसृष्टीत कामाच्या तासांवरील सुरू असलेल्या वादविवादाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनीदेखील आता मौन सोडले आहे. बॉलिवूड बबलशी अलिकडेच झालेल्या संभाषणात, सुप्रिया पाठक यांनी आठ तासांच्या शिफ्टबद्दल भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, अभिनयासाठी महत्त्वपूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी आवश्यक असते. अनेकदा खूप व्यस्त वेळापत्रकामुळे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळेच आठ तासांची शिफ्ट असणे हे खरोखर गरजेचे आहे.
अधिक बोलताना त्या म्हणाल्या, “अभिनय ही अशी कला आहे की जर मी स्वतःवर काम केले नाही तर मी प्रेक्षकांसमोर माझी कला सादर करताना कमी पडेन. जेव्हा एक कलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर यायचे असते तेव्हा तुम्हाला स्वतःलाही मानसिकदृष्ट्या तयार करावे लागते.”
सुप्रिया यांनी त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन साधताना महिलांना येणाऱ्या अनोख्या आव्हानांवर प्रकाशझोत टाकला. महिला अनेकदा एकाच वेळी अनेकविध जबाबदाऱ्या हाताळतात. या मुद्द्यावर अधिक बोलताना त्या म्हणाल्या, एक स्त्री म्हणून तिला अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. त्यामुळेच काम आणि कुटूंब सांभाळताना मानसिकदृष्ट्या देखील कसरत होते. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी उत्तम सिद्ध करायचे असेल तर आठ तासांच्या शिफ्टची खरोखरच गरज आहे.
२०२४ मध्ये दीपिकाने कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर तिच्या मुलीच्या संगोपनासाठी तिने आठ तासांची शिफ्ट मागितली होती. हा मुद्दा बाॅलीवूडमध्ये खूप चर्चिला गेला होता. प्राधान्यक्रमांमधील बदलामुळे दीपिकाला ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘स्पिरिट’ सारख्या मोठ्या चित्रपटांमधून बाहेर पडावे लागले होते.

























































