प्रसिद्ध वास्तुविशारद जयंत टिपणीस यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

प्रसिद्ध वास्तुविशारद जयंत चिंतामणी टिपणीस यांचे गुरूवारी दुपारी 12.30 च्या सुमारास शिवाजी पार्क येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि चार नातवंडे असा परिवार आहे.

त्यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत टिपणीस कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी उभी केली. आयआयटी पवईतील इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिपार्टमेंटचा लेक्चर हॉल त्यांनी डिझाईन केला होता. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र पोलीस असोसिएशनचे ते आर्किटेक्ट होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझाईनच्या मुंबई विभागीय शाखेचे ते अध्यक्ष होते. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.