प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या कथ्थक नृत्यासाठी जगभरात प्रसिद्धी पावलेले पंडित बिरजू महाराज यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. आपल्या नातवाशी खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच ते किडनी विकारातून बरे झाले होते आणि डायलिसिसवर होते. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

पंडित बिरजू महाराज यांना नृत्यविश्वात पंडितजी किंवा महाराज म्हणून ओळखलं जायचं. हिंदुस्थानातील आधीच्या पिढीच्या अग्रगण्य नर्तकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं. त्यांचे काका शंभू महाराज आणि लच्छू महाराजही कथ्थक नर्तक होते. त्यांचे वडील अच्छन महाराज हेही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज होते.

पंडित बिरजू महाराज यांनी देवदास, डेढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी सत्यजित राय यांच्या शतरंज के खिलाडी या चित्रपटाला संगीतही दिलं होते. 1983साली त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही प्राप्त झाले होते.