
तब्बल तीनशेहून अधिक मराठी चित्रपटांत भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे शनिवारी पहाटे कोल्हापुरातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. दुपारी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सहाय्यक भूमिकांसाठी भालचंद्र कुलकर्णी यांना ओळखले जायचे. त्यांनी ‘मर्दानी’, ‘मासूम’, ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली पुंकू हसलं’, ‘माहेरची साडी’, ‘नवरा नको गं बाई’, ‘सोंगाडय़ा’, ‘पिंजरा’, ‘थरथराट’, ‘मुंबईचा जावई’, ‘खतरनाक’ आदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते संचालक होते. चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, बँड कोल्हापूर जीवनगौरव अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढय़ात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले होते.

























































