ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार ‘महाराष्ट्र भूषण’ने सन्मानित

अनेक उत्तमोत्तम शिल्प साकारणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांना आज ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाची शंभरी पार केलेल्या राम सुतार यांची प्रकृती ठीक नसल्याने नोएडा, उत्तर प्रदेश येथील निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशा भावना राम सुतार यांनी व्यक्त केल्या. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार, स्थानिक खासदार डॉ. महेश शर्मा आणि सुतार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सुतार यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुळे जिह्यातील छोटय़ा गावात जन्मलेल्या राम सुतार यांनी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मोठय़ा कष्टाने स्वतःची कारकीर्द घडवली. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले. आज असे राज्य नाही, जिथे त्यांचे शिल्प नाही. आपल्या देशातच नव्हे तर 15 राष्ट्रांमध्ये त्यांची शिल्पे आहेत. सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांचा पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी शिल्प अशा अनेक ऐतिहासिक कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. राम सुतार यांची प्रकृती ठीक नसल्याने आजचा समारंभ त्यांच्या घरी केला. या वेळी ते आमच्याशी बोलले. त्यांच्या मनात महाराष्ट्र आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ असे ते म्हणाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.