
योगेश पाटील । हिंगोली
‘देशामध्ये आतंकवाद्यांसाठी न्यायालयाचे दरवाजे रात्री 12 वाजता उघडतात. मात्र, सर्वोच्च न्यायालय राम मंदिर खटल्यात ’तारीख पे तारीख’ देत आहे. सध्या भाजपचे सरकार असून संसदेत प्रस्ताव आणून कायदा करावा अन्यथा तुफान उठेल’, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी हुंकार सभेत दिला. देशात पुन्हा निजाम निर्माण करण्याचे षडयंत्र ओवेसी रचत असुन हिंदुंनी राम मंदिर निर्माणासाठी पेटून उठावे असे आवाहनही गायकर यांनी केले. हिंगोली शहरातील रामलिला मैदानावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून शंकर गायकर हे उपस्थित होते.
यावेळी विहीपचे क्षेत्रीयमंत्री शंकर गायकर म्हणाले की, देशातील करोडे हिंदुचा आत्मा असलेल्या रामासाठी न्यायालय चालढकल करत आहे. न्यायाधीश हे राम आणि देशापेक्षा मोठे आहेत काय? 1992 मध्ये राम मंदिरासाठी राम भक्तांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. राम हे या देशाचे व भुमिचे प्राण आणि अस्तीत्व आहेत. कोट्यावधी हिंदू आणि बहुतांश मुस्लीमांची देखील राम जन्मभुमीत राम मंदिर व्हावे, अशी इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाला 9 हजार पानांचे पुरावे 50 हजार दस्ताऐवज, पुरातन संस्कृतीचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या राम नाम करत फिरत असून त्यांना आरती डावीकडून करावी की उजवीकडून हे कळत नसल्याचा टोला गायकर यांनी लगावला. ओवेसी हिंदुंना आव्हान देण्याची भाषा करत असून राम मंदिराला विरोध करत आहे. हिंदू समाज सहिष्णु असला तरीही राम मंदिर निर्माणासाठी आता संकल्प करावा लागेल, असेही गायकर यांनी भाषणात सांगितले. शरयुच्या तीरावर 1992 ला हिंदु बांधवांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. बलिदान दिलेल्या या राम भक्तांचे स्मरण करुन हिंदुंनी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रभु रामचंद्र हिंदुस्थानचे श्रध्दास्थान आहे. यासाठी संसदेत कायदा करुन राम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. या सभेला महेश बियाणी, सावरमल अग्रवाल, संदिप दारव्हेकर, भास्कर पाठक, सुखबीरसिंग अलग, राजेंद्र हलवाई, पराग कौलवार, कैलास श्रीनाथ, डॉ. संजीव जवळेकर यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































