चीन सीमेवर ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अरुणाचल प्रदेशसह सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाख या भागात ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’ नक्कीच चांगला आहे. त्याला पुरेसे यश मिळायला पाहिजे. या सगळ्याची अंमलबजावणी करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक वेळेला आपण चांगले कार्यक्रम बनवतो, परंतु त्याची जर अंमलबजावणी ठीक झाली नाही, तर त्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे यश आपल्याला मिळत नाही. आशा करू या त्या प्रोग्रामला यश मिळेल. ज्यामुळे हिंदुस्थान-चीन सीमा ही अजून जास्त सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल.

केंद्र सरकारच्या ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’ कार्यक्रमाचा प्रारंभ अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबिथू या गावापासून 10 एप्रिलला करण्यात आला. केंद्र सरकारने ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’ कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या कार्यक्रमासाठी सरकारने 4800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 2500 कोटी रुपये आर्थिक वर्ष 2022-23 ते 2025-26 दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’ या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच लडाख या केंद्रशासित प्रदेशातील 19 जिह्यांतील 46 गटांतील 2967 खेडय़ांचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 662 खेडय़ांचा प्राधान्यक्रमाने विकास केला जाईल. त्यात अरुणाचल प्रदेशातील 455 खेडय़ांचा समावेश आहे.

हे असे का केले जात आहे? सध्याची परिस्थिती काय आहे? ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय फायदा होईल? गेल्या दोन-तीन वर्षांत चीनने अनेक वेळा घोषणा केल्या की, ते 650 हून जास्त गावे चीन-हिंदुस्थान चीन सीमेवर वसवत आहेत. त्यातील काही गावे हिंदुस्थान आणि भूतानच्या हद्दीत आहेत असा त्यांचा दावा आहे.

सीमेवर कोणीही राहत नाही, सगळ्या ठिकाणी सैनिक नसतात. त्यामुळे सीमेवर लक्ष ठेवणे कठीण असते. जर स्थानिक रहिवाशांना तिथे राहण्यासाठी मदत केली तर सीमेवर आपोआप लक्ष ठेवले जाऊ शकते. हे लोक शक्यतो गुराखी किंवा ग्रेझर्स असतात. शेळ्या, मेंढय़ा, याक अशा प्रकारची जनावरे त्यांच्याकडे असतात. चिनी गुराखी चराऊ जमिनीसाठी चिनी सैन्याच्या दबावामुळे हिंदुस्थानच्या हद्दीत अतिक्रमण करतात. त्यांना अनेक वेळा सिव्हिल ड्रेसमध्ये चिनी सैनिकांची मदत असते. चीनचा हा कार्यक्रम अतिशय पद्धतशीरपणे चालू आहे.

हिंदुस्थान-चिनी सीमेवर राहणारी लोकसंख्या ही 10 टक्क्यांनी वाढली आहे. चीनने या भागामध्ये 30 ते 40 बिलियन युऑन्स किंवा 4.4 बिलियन डॉलर एवढा पैसा खर्च केला आहे. अनेक ग्रामस्थांना दरवर्षी 1800 डॉलर्स एवढा पैसा या भागामध्ये राहण्याकरिता दिला जातो. याशिवाय या ठिकाणी पर्यटनाला खूप मोठय़ा प्रमाणात मदत केली जात आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या ग्रामस्थांचे उत्पन्न वाढले आहे. या सगळ्यामुळे चीनची सीमेवर राहणारी लोकसंख्या ही 10 टक्क्यांनी वाढली. ज्या वेळेस चीनचा हा कार्यक्रम पूर्णपणे अमलात आणला जाईल, त्या वेळेला अडीच लाखांहून जास्त नागरिकांना हिंदुस्थान-चीन सीमेवर वेगवेगळ्या गावांमध्ये वसवले जाईल. चीनचा उद्देश साफ आहे. या गावांचा वापर करून हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांत अतिक्रमण करायचे आणि नंतर हा भाग आमचाच आहे असे म्हणायचे.

बहुतेक हिंदुस्थान-चीन सीमेवरून आता रिव्हर्स मायग्रेशन होत आहे. म्हणजे सीमेवर राहायला कोणीही नागरिक तयार नाही. कारण तिथे रस्ते, पाणी, वीज , मेडिकलची सुविधा नाही. ज्या सुविधा शहरात मिळतात, त्या येथे मिळत नाहीत. म्हणून सीमेवर राहणाऱयांची संख्या ही प्रत्येक वर्षी कमी होत आहे. उत्तराखंडच्या आकडेवारीप्रमाणे 2011 ते 2018 या काळात 185 सीमेवर वसलेली गावे आता पूर्णपणे खाली झालेली आहेत. घोस्ट व्हिलेजेस म्हणजे आता कोणीही माणूस न राहणारे गावे आहेत. हीच परिस्थिती हिमाचल प्रदेशमध्येसुद्धा आहे, जिथे लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी कमी होत आहे. लडाखची लोकसंख्या पहिलीच फार कमी होती. सीमेवर राहणाऱ्या लडाखी लोकांची संख्याही अजून कमी झाली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानी गुराखी जी चराऊ जमीन आपल्या ताब्यात असते, तिथेसुद्धा जायला तयार नसतात. अर्थात हिंदुस्थान-चीन सीमेवर राहणारे रहिवासी देशभक्त आहेत. ते लोक हिंदुस्थानी सैन्याचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. या भागातील गुराखी किंवा इतर नोमॅडिक लोक शत्रूच्या हालचालींविषयी आपल्याला लगेच माहिती देतात. कारगील युद्धामध्ये आठवत असेल, सर्वात पहिली पाकिस्तानची घुसखोरी ही कारगीलमध्ये राहणाऱया गुराख्यांनीच समोर आणली होती. अनेक वेळा चिनी सैनिक येऊन दमदाटी करतात आणि सांगतात, तुम्ही आमच्या भागात येत आहात, तुम्हाला येथे येण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे घाबरून आपले गुराखी तिकडे जात नाहीत. आता ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’च्या अंतर्गत लोकसंख्येचे हे रिव्हर्स मायग्रेशन थांबवले जाईल. याकरिता सरकार या भागामध्ये रस्ते बांधणार आहे. ज्या सुविधा शहरांमध्ये मिळतात, त्याच सुविधा या भागातील नागरिकांना मिळायला सुरुवात होईल. यामध्ये घरे, राहण्याकरिता इतर सुविधा, रोजगाराच्या इतर संधी अशा प्रकारच्या सुविधा तिथे निर्माण केल्या जातील. जसे लडाखमध्ये झाले. म्हणजे पर्यटकांना सीमेपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. ज्यामुळे या भागात राहणाऱया लोकांचे उत्पन्न वाढेल. इनरलाइन परमिटमुळे येथील स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे.

अरुणाचल प्रदेशसह सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाख या भागात ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’ नक्कीच चांगला आहे. मात्र या सगळ्याची अंमलबजावणी करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक वेळेला आपण चांगले कार्यक्रम बनवतो, परंतु त्याची जर अंमलबजावणी ठीक झाली नाही, तर त्यामध्ये यश मिळत नाही.

> [email protected]