दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात जागतिक समुदायाने कठोर कारवाई करावी – एम. व्यंकय्या नायडू

461

दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात जागतिक समुदायाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केली. नायडू यांच्या उपस्थितीत सोमवारी गोवा विद्यापीठाचा 32 वा दीक्षांत सोहळा पार पडला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सत्यपाल मलीक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुलगुरू वरुण साहनी यांची उपस्थिती होती.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू आहे आणि आपल्या शेजारी देशांपैकी एक देश सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. हिंदुस्थान शेजारी देशांबरोबर शांततेला प्राधान्य देतो. लोकशाहीत हिंसेला अजिबात थारा नाही आणि युवकांनी नकारात्मकता सोडून विकासाची कास धरावी. मतभेद हे लोकशाहीचे वैशिष्ट्ये आहे. मात्र, देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे उपराष्ट्रपती म्हणाले. सध्या लोक राज्यघटनेच्या महत्वाबद्दल बोलत असल्याबद्दल नायडू यांनी आनंद व्यक्त केला. हे सकारात्मकतेचे लक्षण आहे. प्रत्येकाने आपली ध्येय साध्य करण्यासाठी राज्यघटनेचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. अधिकार आणि जबाबदारी एकत्र येते, याची त्यांनी आठवण करुन दिली. युवकांनी पुढे येऊन देशाला मजबूत करण्यासाठी चांगली वर्तवणूक, चारित्र्य, क्षमता जपली पाहिजे आणि जात, समुदाय, पैसा आणि गुन्हेगारीला दूर केले पाहिजे.

युवकांनी 21 व्या शतकातील गरजांची पूर्तता करण्यासाठी खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या अपार संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या विद्यापीठांनी युवकांना शिक्षण आणि कौशल्य प्रदान करावे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. गोवा विद्यापीठात 30,000 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60 टक्के मुली असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. पुरुषांबरोबरच महिलांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. गोवा विद्यापीठाच्या 32 व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी 10627 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या