
कोरोना लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिने बॉलिवूड थंडावलं आहे. तिकीटबारीवर तुलनेने गर्दी कमी असली तरी नवीन चित्रपटांच्या घोषणा होत आहेत. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक आणि पौराणिक संहितांचा समावेश आहे. याच यादीत आता अजून एका चित्रपटाची भर पडली आहे.
हा चित्रपट म्हणजे बहुचर्चित अश्वत्थामा. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आला होता. प्रतिभावान आणि सध्या बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेला अभिनेता विकी कौशल या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. आपल्या करियरमधील हा सर्वात मोठा चरित्रपट असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विकीने त्याच्या या नव्या चरित्रपटाचं पोस्टर आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलं आहे.
या चित्रपटात विकी हा सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या अश्वत्थामा या महाभारतातील पात्राची भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये अश्वत्थामाला आधुनिक काळातील सुपरहिरोप्रमाणे दाखवण्यात येणार आहे. याच भूमिकेसाठी विकी कौशल 100 किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन वाढवत आहे. त्यासाठी विकी जोरदार वर्कआउट करत आहे. यासोबत तो घोडेस्वारी, मार्शल आर्टसचे ट्रेनिंगदेखील घेत आहे.
फिल्मचे शुटिंग यूरोपमध्ये होणार असून शेवट मुंबईत होईल. तसेच ग्रीनलँड, आयर्लंड, इंग्लंड यासह टोकिओ, न्यूझिलँड आणि नमीबिया येथे देखील होणार आहे. खरं तर याचं चित्रीकरण याच वर्षी होणार होतं, मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून रोनी स्क्रूवाला यांची ही निर्मिती आहे.
अश्वत्थामा बायोपिकची घोषणा होण्याआधी विकीकडे शहीद उधम सिंह, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आणि करण जौहर यांच्या तख्त यासारखे मोठे चित्रपट आहेत. याआधी 2019 मध्ये आदित्य धर आणि रोनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेला उरी: द सर्जीकल स्ट्राईक बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटासाठी त्याला तीन राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले होते.

























































