
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, नाशिकलाही आज पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले असून सिंधुदुर्गमधील सावंतवाडीमध्ये अवकाळी पाऊस बरसला.
मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱयाची दिशा बदललेली आहे आणि वेगदेखील वाढलेला आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेले असतील, मात्र बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून ’ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तापमानात होणार घट
मे महिन्यात विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होते. मात्र पावसामुळे विदर्भात तापमानामध्ये 3 ते 5 अंश डिग्री सेल्सिअसने घट होणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आहे. मे महिन्यात विदर्भात सरासरी तापमान हे 45 ते 47 डिग्रीपर्यंत जाते, मात्र आता तापमान घटले आहे.