विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी, वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल

पत्रकार, साहित्यिक आणि संगीत नाटककार असलेल्या विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 4 जानेवारीपासून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्याधर गोखले संगीत-नाटय़ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी गोखले यांच्या 7 संगीत नाटकांच्या पुस्तकांचा संचही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

विद्याधर गोखले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्या मराठी पिढीला व्हावी आणि जुन्या पिढीला पुनर्प्रत्यय यावा, यासाठी गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ बुधवार, 4 जानेवारीपासून एकाच दिवशी, एकाच वेळी या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून सादर केला जाणार आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी मंदिरात संध्याकाळी 6.30 वाजता विद्याधर गोखले यांच्या नाटकातील रागदारी बंदिशींचा कार्यक्रम ‘बसंत की बहार’ सादर केला जाणार आहे. यात पंडित विश्वनाथ कान्हेरे, विदूषी श्रुती सडोलीकर काटकर, पं. राम देशपांडे, पं. सुरेश बापट, ज्ञानेश पेंढारकर, मैत्रेयी रॉय दादरकर, धनंजय पुराणिक आदी सहभागी होणार आहेत. संकल्पना, निवेदन शुभदा दादरकर यांचे आहे.

विविध संकल्पनेवर कार्यक्रम

‘जय शंकरा विद्याधरा’, ‘विद्याधर भक्तिगीतगंगा’, ‘प्रेयसी ते परमेश्वर’ या गाजलेल्या कार्यक्रमांच्या बरोबरीने ‘अष्टपैलू विद्याधर,’ संगीत नाटकातील श्रीकृष्ण गीतांचा स्मृती तळपदे यांचा नृत्यमय संगीत कार्यक्रम ‘रंगला श्रीहरी’, विद्याधर गोखले लिखित ‘फुलवा मधुर बहार’ हे संगीत बालनाटय़ वर्षा भावे यांच्या कलांगण संस्थेच्या वतीने सादर केले जाणार आहे. काही संगीत नाटकांचे प्रयोग वर्षभर केले जाणार आहेत. त्याचबरोबर नाटय़गीतरंगच्या ‘यूटय़ूब’ चॅनेलवर वर्षभर दर रविवारी सकाळी 9.30 वाजता विद्याधर गोखले यांनी लिहिलेले अग्रलेख, कविता इत्यादींचे नामवंत कलाकारांनी केलेले अभिवाचन आणि त्यांच्या सहवासातील व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक शुभदा दादरकर यांनी दिली.