Retro प्री-रिलीज इव्हेंटमधील वक्तव्य भोवलं, विजय देवरकोंडाविरुद्ध FIR दाखल; काय आहे प्रकरण?

‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमधील विधानामुळे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एप्रिल 2025 मध्ये केलेल्या विधानामुळे हैदराबादच्या आर.एस. नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या त्याच जुन्या विधानामुळे त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजयवर आदिवासींचा अपमान केल्याचा आरोप आहे, ज्यासाठी त्यांच्याविरुद्ध रायदुर्गम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी समुदायाचे नेते अशोक कुमार राठोड यांनी विजयविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि आरोप केला आहे की, त्यांचे विधान आदिवासी समुदायाचा अपमान आहे. पोलिसांनी सांगितले की, विजयविरुद्ध एससी/एसटी (SC/ST Act) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

विजय देवरकोंडा 26 एप्रिल रोजी सूर्याच्या ‘रेट्रो’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित होता. तिथे पहलगाम हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला होता की, “कश्मीरमध्ये जे काही घडत आहे ते संपवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांना शिक्षित करणे आणि कोणीही त्यांचे ब्रेनवॉश करू नये, याची खात्री करणे. कश्मीर हिंदुस्थानचा आहे आणि कश्मिरी आपले आहेत. हिंदुस्थानला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही. तिथले लोक स्वतः (पाकिस्तानी) त्यांच्या सरकारवर नाराज आहेत आणि जर हे असेच चालू राहिले तर ते लोक त्यांच्यावर हल्ला करतील.”

यावेळी बोलताना तो पुढे म्हणाला होता की, “ते असे वागतात, जसे आदिवासी 500 वर्षांपूर्वी अक्कल नसल्यासारखे वागायचे.” त्याच्या या विधानावरून गोंधळ उडाला आणि त्यांच्यावर आदिवासींचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.