विजय हजारे ट्रॉफी; मुंबईकडून गोव्याचा 130 धावांनी धुव्वा

436

सलामीवीर यशस्वी जैसवालचे धडाकेबाज शतकआदित्य तरेच्या दमदार 86 धावासिद्धेश लाड (34 धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (47), सूर्यकुमार यादव (नाबाद 34), शिवम दुबे (नाबाद 33) यांची महत्त्वपूर्ण खेळीअन् सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबईने मंगळवारी विजय हजारे ट्रॉफीतील एलिट गटाच्या लढतीत गोव्याचा 130 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईचा पाच सामन्यांमधून हा दुसरा विजय ठरलाय. गोव्याला तीन पराभवाला सामोरे जावे लागले.

मुंबईकडून मिळालेल्या 363 धावांचा पाठलाग करणाऱ्या गोव्याचा डाव 232 धावांमध्येच गडगडला. आदित्य कौशिकने 43, स्नेहल कौठंकरने 50 धावांची खेळी साकारली, मात्र इतर फलंदाजांना आपली धमक दाखवता आली नाही. मुंबईकडून शम्स मुलानीने 38 धावा देत 3 फलंदाज बाद केले. शार्दुल ठाकूरने 2 फलंदाज बाद केले. धवल कुलकर्णी, शशांक अतार्डे, शिवम दुबे, शुभम रांजणे व यशस्वी जैसवाल यांनी प्रत्येकीगडी बाद केला.

152 धावांची दमदार सलामी

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी युवा यशस्वी जैसवाल व अनुभवी आदित्य तरे या सलामी जोडीने 152 धावांची दमदार भागीदारी रचताना गोव्याच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. यशस्वा जैसवालने 123 चेंडूंत 5 सणसणीत षटकार व 6 चौकारांसह 113 धावांची जबरदस्त खेळी साकारली. आदित्य तरेने 2 षटकार व 11 चौकारांसह 86 धावांची खेळी केली. मुंबईने 4 बाद 362 धावा तडकावल्या.

आपली प्रतिक्रिया द्या