
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
मुंबईच्या क्रिकेट संघाची विजय हजारे ट्रॉफीतील विजयी घोडदौड मंगळवारीही सुरूच राहिली. अखिल हेरवाडकरच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने गोव्याला 7 गडी व 87 चेंडू राखून हरवले. मुंबईचा हा सात सामन्यांमधून सहावा विजय ठरलाय. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतलीय.
गोव्याकडून मिळालेल्या 187 धावांचा पाठलाग करणाऱया मुंबईने तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. अखिल हेरवाडकरने 112 चेंडूंत 4 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 108 धावांची शानदार खेळी केली. जय बिस्ताने 32 आणि सिद्धेश लाडने नाबाद 26 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली.
दरम्यान, याआधी गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमित वर्माने 49 धावांची आणि एस. प्रभुदेसाईने 52 धावांची खेळी केली, पण त्यांना काही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मध्यमगती वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने तीन फलंदाज बाद केले. रॉयस्टन डियास, शम्स मुलानी व शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.





























































