
पंजाबचा डाव अवघ्या 216 धावांत गुंडाळल्यानंतर सरफराज खानच्या 20 चेंडूंतील 62 धावांच्या झंझावाताने मुंबईचा विजय सोप्पा केला होता. एकवेळ मुंबईला 31 षटकांत अवघ्या 26 धावांची गरज होती आणि सहा फलंदाजही शिल्लक होते. तरीही मुंबईने आपले सहाही फलंदाज 24 धावांत गमावले आणि पंजाबने एका धावेने विजय मिळवत गटात अव्वल स्थान संपादले. आजच्या पराभवामुळे विजय हजारे करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईचा मुकाबला ‘अ’ गटात अव्वल असलेल्या कर्नाटकशी होईल. साखळीतील सातही सामने जिंकत अपराजित राहिलेला उत्तर प्रदेशचा संघ सौराष्ट्रशी भिडेल तर पंजाब-मध्य प्रदेश आणि दिल्ली-विदर्भ अशा दोन उपांत्यपूर्व लढती रंगतील.
आज मुंबईने अपेक्षाभंग केला. मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबचा फलंदाजी 45.1 षटकांत 216 धावांवर संपवली. अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक 57 धावा केल्या. मुंबईसाठी मुशीर खानने 37 धावांत 3 विकेट टिपल्या तर ओमकार टरमाळे, शिवम दुबे आणि शशांक अतार्डे यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवले. 217 धावांचा पाठलाग करताना अंगक्रिष रघुवंशी आणि मुशीर खानने 57 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर सरफराज खानने 15 चेंडूंत अर्धशतक ठोकताना पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माच्या एका षटकात 3 षटकार आणि 3 चौकार खेचत 30 धावा चोपून काढल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 34 चेंडूंत 45 धावा खेचल्या. त्यामुळे मुंबईचा विजय अधिक सोप्पा झाला होता. 19 षटकांत 4 बाद 190 अशा मजबूत स्थितीत असलेल्या मुंबईने शिवम दुबेच्या रूपात पाचवी विकेट गमावली आणि अवघा सामनाच फिरला. पुढे अय्यरही बाद झाला. मग हार्दिक तामोरे आणि शम्स मुलानीने धावफलक 212 वर नेला. तेव्हा मुंबई विजयापासून केवळ पाच धावा दूर होती. पण पुढील 3 धावांतच पंजाबने मुंबईचे चार फलंदाज बाद करत अवघ्या एका धावेने अनपेक्षित विजय मिळवला.































































