अटकेपासून दिलासा द्या, विजय कोकाटेंची हायकोर्टात धाव, उद्या सुनावणी

 शासकीय कोटय़ातून सदनिका बळकावल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा भाऊ विजय कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकेपासून दिलासा द्या, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरसारख्या भागात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करुन माणिकराव व त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांनी दोन सदनिका लाटल्या. याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. याप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी विजय कोकाटे यांनी हायकोर्टात अॅड. श्रीशैल्य देशमुख व अॅड. निमीश पारख यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याची दखल घेत सरकारला याचिकेची प्रत देण्याचे सांगत या प्रकरणावरील सुनावणी सोमवारी ठेवली.