
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानातल्या तब्बल 17 बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याच्या दोन हेलिकॉप्टर्सचा लिलाव करण्यात आला. दिल्लीच्या चौधरी एव्हिएशन कंपनीने 8 कोटी 75 लाख रुपयांना या हेलिकॉप्टर्सची खरेदी केली. पाच आसनी एअरबस युरोकॉप्टर दहा वर्षे जुने असल्याचे चौधरी एव्हिएशनचे संचालक सत्येंद्र सहरावत यांनी सांगितले. कर्ज वसुली प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक लिलावाच्या माध्यमातून हेलिकॉप्टर्सचा लिलाव केला.
-लिलावात तीन कंपन्यांनी सहभाग घेतला. एका हेलिकॉप्टरसाठी कमीत कमी 1 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावण्याची अट होती. यात एक हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू विमानतळावर उभे असून कंपनी दोन्ही हेलिकॉप्टर्सचा व्यावसायिक वापर करणार आहे.
मल्ल्याकडून आतापर्यंत 963 कोटी रुपयांची वसुली
मल्ल्याने 2007 ते 2012 दरम्यान बँकांकडून कर्ज घेतले, परंतु ते फेडले नाही. त्याच्यावर 9 हजार 380 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मल्ल्याची संपत्ती विकून 963 कोटी रुपये वसूल करण्याची माहिती एसबीआय बँकेने जुलैमध्ये दिली होती. दरम्यान, 2016 पासून मल्ल्या लंडनला पळाला होता. लंडनच्या न्यायालयात मल्याच्या प्रत्यार्पणाबाबतचा खटला सुरू आहे. या खटल्यावर 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.



























































