हिंदी सक्तीसाठी छत्रपतींचा अपमान… सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार भडकले

हिंदी सक्तीचा जीआर मागे घ्यायला लागल्यामुळे थयथयाट करणारे मिंधेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे संतापले असून त्यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांना खडसावले आहे.

”छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला व आमदार संजय गायकवाड यांना फटकारले

संजय गायकवाड यांचं वक्तव्य :

हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्याविषयी पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारताच ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते काय मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी, जिजाऊँ हे सर्व बहुभाषिक होते. ते काय मूर्ख होते का जे त्यांनी इतक्या भाषा शिकल्या. त्यामुळे भाषेवरून वाद करणं चुकीचं आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नेटकरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.