राजीनाम्याने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवार यांचे विरोधकांना उत्तर

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या राजीनाम्यामुळे प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देतो, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला. राज्य निवडणूक आयोगाने पाच जिह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. पाच जिह्यांत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस पक्ष जबाबदार नाही. त्याला भाजप जबाबदार आहे हे त्यांनी मान्य करावे. ओबीसी आरक्षण जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे भाजपला वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत. या पाच जिह्यांतील निवडणुका व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून जे काही राजकीय अकांडतांडव सुरु आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी आहे. त्यापलीकडे काही नाही. महाराष्ट्रातील जनता योग्य निर्णय घेईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

भाजपच्या पराभवावर एकमत

महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाहीत. भाजपचा पराभव करायचा आहे यावर महाविकास आघाडीचे एकमत आहे, असेही ते म्हणाले.

वॉर्डबाबत काही निर्णय नाही

राज्यातील अ, ब आणि क महापालिकेत किती वॉर्ड असावेत अशी चर्चा सुरू आहे. काहीच अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या