
कन्नमवारनगरच्या संक्रमण शिबिरातील तब्बल 278 कुटुंबांना ‘म्हाडा’च्या सुसज्ज टॉवरमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत. विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्या पाठपुराव्यातून संक्रमण शिबिरातील रहिवाशांना मिळालेल्या हक्काच्या घरांच्या चाव्या ‘म्हाडा’ सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. डिसेंबरपर्यंत या ठिकाणचे एकही कुटुंब ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये राहणार नाही असे आश्वासन यावेळी शिवसेनेकडून देण्यात आले.
कन्नमवारनगर येथील संक्रमण शिबीर इमारत क्रमांक 180 अ/ब, 186 अ/ब, 190 अ/ब आणि 104 मधील 278 कुटुंबाना ‘म्हाडा’च्या टॉवर क्रमांक 7 अ, 7 क मध्ये घरे देण्यात आली. कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक 180 अ/ब, 186 अ/ब,190 अ/ब आणि 104 या इमारतीमधील रहिवासी गेल्या 40 वर्षांपासून जीव मुठीत घेऊन राहत होते. या ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये स्लॅब, छप्पराचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आमदार सुनील राऊत यांनी पाठपुरावा करून आत्तापर्यंत 762 कुटुंबांना सुसज्ज आणि सुरक्षित घरे मिळवून दिली आहेत. यामध्ये आता आणखी 278 कुटुंबांना घरे मिळवून देण्यात आली. यामध्ये ऑगस्टअखेरेपर्यंत आणखी 139 आणि डिसेंबर अखेरपर्यंत ट्रांझिस्ट कॅम्पमध्ये एकही कुटुंब ठेवणार नाही. प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणार असे आश्वासन आमदार सुनील राऊत यांनी यावेळी दिला. यावेळी भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर, नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, विधानसभा संघटक ऍड. परम यादव, उपविभाग संघटिका रश्मी पहूडकर, शाखाप्रमुख अभय राणे, विजय सोनमळे, शिवसेना पदाधिकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मेंटेनन्स कमी करा!
‘म्हाडा’च्या या घरांमध्ये गोरगरीब राहत आहेत. यांना 3 हजारांचा मेंटेनन्स भरावा लागतो. त्यामुळे हा मेंटेनन्स कमी करावा अशी मागणी यावेळी सुनील राऊत यांनी केली. तसेच कुटुंबांना घराची ओनरशिप दिल्यास या विभागात घुसलेल्या दलालांचा त्रास कमी होईल असेही ते म्हणाले. यावर संबंधित बाबींवर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन विनोद घोसाळकर यांनी दिले.




























































