
विक्रम लँडर’चे नेमके काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, ‘इस्रो’ने खुशखबर दिली आहे. चंद्रावर विक्रम लँडरने हार्ड लॅण्डिंग (आदळले) केले. पण ‘विक्रम’ सुस्थितीत आहे. नुकसान झालेले नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर थोडे तिरके उभे आहे. दरम्यान, ‘इस्रो’कडून विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी रविवारी आनंदाची बातमी दिली होती. विक्रम लँडरचा ठावठिकाणा सापडला असून, त्याचे फोटो ऑर्बिटरने काढले आहेत, असे सिवन यांनी सांगितले होते. मात्र, विक्रम लँडर कशा स्थितीत आहे? याची उत्सुकता देशभर होती. याबाबत आज आणखी मोठी आनंदाची बातमी आहे.
14 दिवस महत्वाचे
जर विक्रम लँडरचा एकजरी भाग निकामी झाला असता तर संपर्क साधणे कठीण होते, असे इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये दाखवलेले स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उभे आहे. त्याला जागेवरून हालवू शकत नाही. जर विक्रमची अँटिनाची दिशा ग्राऊंड स्टेशन किंवा ऑर्बिटकडे असेल तर इस्रोचे काम सोपे होईल. विक्रमवर सौर पॅनलची ऊर्जा आहे. 14 दिवस अतिशय महत्वाचे आहेत, असे इस्रोचे म्हणणे आहे.
नेमकी काय स्थिती…
‘इस्रो’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘विक्रम’ने चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लॅण्डिंग केले म्हणजेच आदळले. पण त्यामुळे विक्रम लँडर तुटलेले नाही. त्याचे काही नुकसान झालेले नाही. थोडे तिरके उभे आहे. ऑर्बिटरच्या कॅमेराने पाठविलेल्या छायाचित्रानुसार ‘विक्रम’ उभे आहे हेच दिसते. ‘विक्रम’शी संपर्क साधल्यानंतर ‘प्रज्ञान’ला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न ‘इस्रो’कडून होईल. हे मोठे आव्हान असले तरी, ‘इस्रो’कडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
संपर्काची 70 टक्के शक्यता
‘विक्रम’शी संपर्क करण्याची शक्यता 60 ते 70 टक्के आहे, असे ‘इस्रो’चे माजीप्रमुख डॉ. माधवन नायर यांनी इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
सिवन यांचे ट्विटर फेसबुक अकाऊंट नाही
‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांचे कोणतेही ट्विटर, फेसबुकवर व्यक्तिगत अकाऊंट नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने दिसत असलेले ट्विटर अकाऊंट बनावट आहे. कोणीतरी सिवन यांचा फोटो वापरून हे अकाऊंट सुरू केले आहे. त्यावर देण्यात येणारी माहिती अधिकृत नाही, असे ‘इस्रो’ने स्पष्ट केले आहे.