
पावसाळय़ात मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱयामुळे डोंगरउतारावरील झोपडय़ांवर दरडी कोसळण्याचा धोका असतो. हा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विक्रोळी आणि घाटकोपरमधील डोंगरउतारावरील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत पावसाळय़ादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱया पाण्यामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपडय़ा वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या एन विभागात येणाऱया विक्रोळी आणि घाटकोपरमधील डोंगरउतारावर राहणाऱया रहिवाशांना सावधानतेच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. तरीही स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वतःची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महापालिका प्रशासन त्याला जबाबदार राहणार नाही, असे ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी स्पष्ट केले आहे.
हे परिसर आहेत धोकादायक
विक्रोळी पार्पसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधीनगर, राहुलनगर, गणेशनगर, खंडोबा टेकडी, आझादनगर, सोनिया गांधीनगर, प्रेमनगर व आनंदनगर या भागातील धोकादायक इमारतींना/ झोपडय़ांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.