
यंदाची उन्हाळी सुट्टी लांबणीवर पडली असून कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तसेच पुन्हा उजळणी घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत पूर्णवेळ शाळा सुरू राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागानेच तशा सूचना दिल्या आहेत. पहिली ते नववी तसेच अकरावीचे वर्ग असणाऱया शाळा सुरू ठेवण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी परिपत्रक जारी केले.
राज्यातील काही शाळांनी शिक्षण विभागाच्या सूचना येण्याआधीच उन्हाळी सुट्टय़ांच्या काळात शाळा सुरू ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. उन्हाळय़ात शाळा सुरू ठेवू नका, अशी मागणी पालक करीत असतानाच आता शिक्षण विभागानेच एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला नसून काही विद्यार्थी अभ्यासात मागे असल्याने शाळा सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. आधीच्या इयत्तेचा अभ्यास पूर्ण न करता जूनमध्ये शाळा सुरू झाल्या तर काही विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घ्यावी लागेल. यात नुकसान विद्यार्थ्यांचे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यंदा शाळांच्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात, तर निकाल मे महिन्यात जाहीर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
वार्षिक परीक्षा शाळांना सोयीनुसार घेऊ द्या
पहिली ते नववी तसेच अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱया आठवडय़ात घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या असून याला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विरोध केला आहे. बहुसंख्य शाळा आणि ज्युनियर कॉलेजनी परीक्षांचे नियोजन केले आहे. काही ठिकाणी परीक्षा सुरू झाल्या आहे. पालकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे आगाऊ आरक्षणदेखील केले आहे, शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शाळांची परीक्षांची तयारी वाया जाणार आहे. पालकांना आर्थिक झळ सोसावी लागणार असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
परीक्षेला उपस्थिती सक्तीची
अपवादात्मक परिस्थिती वगळता विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला उपस्थित राहणे सक्तीचे आहे. याआधी शाळांतील उपस्थितीवर निर्बंध होते. 50 टक्के उपस्थितीची अट होती. आता ही अट काढून टाकली आहे. आता 100 टक्के उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने उपस्थितीसंदर्भात कोणतीही सक्ती केली नाही.
-महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक विभाग
































































