बिहारमध्ये मंत्र्यांना गावकऱ्यांनी पिटाळले, आमदार आणि मंत्र्यांनी धूम ठोकली

बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरपर्यंत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. त्याआधीच बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बिहारमधील नालंदा येथे भेटायला गेलेले ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि हिल्साचे आमदार कृष्णा मुरारी ऊर्फ प्रेम मुखिया यांना गावकऱ्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. गावकऱ्यांनी आमदार आणि मंत्र्यांचे स्वागत काठ्यांनी केले. त्यांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी दोन्ही नेते एक किलोमीटर पळून गेले आणि तीन वाहने बदलली.

बिहारमध्ये तीन दिवसामध्ये मंत्र्यांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी पाटण्यातील अटल पथावर आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली होती. हिल्साच्या आमदाराने रस्ता अडवणाऱ्या लोकांना आश्वासन दिले होते की, सरकार योग्य ती नुकसान भरपाई देईल. त्यासाठी मी योग्य ती मदत करेन. पीडितांना भेटण्यासाठी तुमच्या गावात येईन. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आमदार मंत्र्यांसह मालमा गावात पोहोचले होते. परंतु, गावकऱ्यांनी आमदार आणि मंत्र्यांना हाकलून लावले आहे.

काय आहे प्रकरण

23 ऑगस्ट रोजी पाटण्यातील फतुहा येथे झालेल्या रस्ते अपघातात हिल्सा येथील 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आमदार आणि मंत्री पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी मालामा गावात आले होते. परंतु गावकऱ्यांचा संताप पाहून अवघ्या काही वेळातच या मंत्री आणि आमदाराने येथून पळ काढला. सर्व बाधित कुटुंबांची भेट झाली आहे, त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जावे लागेल, असे मंत्री श्रवण कुमार म्हणाले, यावर गावकरी संतापले. आजपर्यंत योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही, आमदार आणि मंत्री म्हणून तुम्ही काय करता असा सवाल गावकऱ्यांनी केला.

मंत्र्यांचा काढता पाय

गावात पोहोचलेले आमदार आणि मंत्री काही तरी ठोस मदत करतील असे गावकऱ्यांना वाटले होते. परंतु, तसे काही झाले नाही. त्यामुळे गावकरी चिडले. काही लोक काठ्या आणि रॉड घेऊन घराबाहेर पडले. मंत्री आणि आमदारांना वाटले की त्यांच्यावर हल्ला होईल. दोघेही घटनास्थळावरून पळून जाऊ लागले. अंगरक्षकांनी मंत्री आणि आमदारांना सुमारे 700 मीटर अंतरावर सुरक्षितपणे त्यांना गावाबाहेर आणून गाडीत बसवले.