प्रियकराला भेटायला जाणाऱ्या अल्पवयीन बहिणींना ‘चेटकीण’ समजून बदडले, टक्कल करून सोडून दिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या अंधारात प्रियकराला भेटायला जात असलेल्या दोन चुलत अल्पवयीन बहिणींना चेटकीण समजून गावकऱ्यांनी मारझोड केली. एवढेच नाही तर दोघींचे संपूर्ण केस कापून त्यांचे टक्कल करून त्यांना सोडून दिले.  ही धक्कादायक घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यात घडली आहे.

बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिमुलतला ठाणे क्षेत्रातील टेलवा बाजार गावात ही घटना घडली. या गावात राहणारे राकेश साव यांचा 5 महिन्याचा मुलगा सत्यम याचा 22 मे रोजी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू कसा झाला याविषयी साव यांच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाकडे विचारणा केली. तेव्हा त्या मांत्रिकाने चेटकिणीमुळे मुलाचा मृत्यू झाला असून त्याच्या प्रेताचे दहन केल्यानंतर रात्रभर त्याच्या प्रेताजवळ बसून त्याचे रक्षण करा. ज्या चेटकिणीमुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे, ती त्याच्या प्रेताजवळ रात्री नक्की  येईल, असे सांगितले.

मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे साव यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मृत मुलाच्या प्रेताचे दहन केल्यानंतर तिथे रात्रभर बसून राहिले. काही वेळाने त्यांना तिथून दोन अल्पवयीन मुली जाताना दिसल्या. प्रेताजवळ रक्षणासाठी बसलेल्यांना वाटलं की, या दोघी मुली म्हणजे चेटकिणीच आहेत. त्यांनी त्या दोघींना पकडलं आणि त्यांना खूप बदडले. एवढेच नाही तर दोघींचेही केस कापून त्यांचे टक्कल करून त्यांना रस्त्याच्या मध्यभागी सोडून दिले.

या घटनेची माहिती एका व्यक्तिने पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनाही तेथील गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी पोलिसांना हकलून दिले. त्यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून या दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. तेव्हा असे कळले की, या दोन्ही मुली रात्रीच्या वेळी आपल्या प्रियकराला भेटायला चालल्या होत्या. रात्रीच्या अंधारात नदीकिनाऱ्याकडून जात असताना त्यांना साव यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी पकडले आणि मारझोड करायला सुरुवात केली.

या घटनेबाबत जमुई पोलीस स्थानकाचे प्रमोद कुमार मंडल यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या तावडीतून या दोन अल्पवयीन मुलींना सोडवले आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे.