
एकीकडे टायर रिसायकलिंग आणि रिट्रेडिंग कंपन्यांनी संपूर्ण वाडा तालुक्याचे आरोग्य बिघडवले असतानाच तालुक्यातील आब्जे येथे टायर कंपनीला परवानगी देणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. गावकऱ्यांनी पंचायत समितीजवळ असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी संखे यांचा पाठलाग केला, त्यांना पकडले आणि पंचायत समिती कार्यालयात आणून डांबून ठेवले. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून ग्रामपंचायत अधिकाऱ्याची पुरती तंतरली आणि त्यांनी बाबापुता करत पुन्हा ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले. त्यानंतरच त्यांची सुटका झाली.
वाडा तालुक्यात सुमारे ६० टायर कंपन्यांचे प्रदूषण गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. टायरवर प्रक्रिया करताना वातावरणात निर्माण होणाऱ्या कार्बनमुळे अनेकांना फुप्फुसाचे विकार झाले आहेत. अनेक गावकऱ्यांची नखे काळवंडली आहेत. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यातच आता आब्जे गावात पच्युएट रिसायकलिंग सोल्यूशन नावाचा नवीन टायर कारखाना येऊ घातला आहे. या कंपनीला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र ग्रामपंचायतीची समिती आणि ग्रामविकास अधिकारी यांनी गावकऱ्यांचा विरोध डावलून या कारखान्याला परवानगी दिली. त्यामुळे गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला.
गावकऱ्यांनी थेट पंचायत समिती गाठली. पंचायत समिती कार्यालयाजवळच ग्रामपंचायत अधिकारी परेश संखे उपस्थित होते. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून संखे यांनी पळ काढला, परंतु ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडून पंचायत समिती कार्यालयात आणले व डांबून ठेवले. पुन्हा ग्रामसभा लावा आणि टायर कंपनीला दिलेली परवानगी रद्द करा अशी मागणी ग्रामस्थ जितेश म्हस्कर आणि तेजस म्हस्कर यांनी केली. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी संखे यांनी नमते घेतले. पुन्हा ग्रामसभा घेईन, गावकऱ्यांची मते जाणून घेईन आणि त्यानंतरच पुढचे ठरवू असे संखे यांनी सांगितल्यानंतरच गावकऱ्यांनी त्यांची सुटका केली.