थायलंडमध्ये लग्न, 19 फ्लॅट, 3 इमारती अन् व्हिला; सरकारी इंजिनियरची डोळे दिपवणारी संपत्ती पाहून ACB चे अधिकारीही अवाक

थायलंडमध्ये मुलाचा शाही विवाह सोहळा, एक व्हिला, तीन इमारती, 19 फ्लॅट, अनेक हॉटेल्समध्ये भागिदारी अन् आलिषान गाड्या. ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि जीवनशैली तुम्हाला कदाचित श्रीमंत व्यवसायिक किंवा उद्योजकाची वाटत असेल. परंतु ही जीवनशैली श्रीमंत व्यवसायिक किंवा उद्योजकाची नसून एका सरकारी अधिकाऱ्याची आहे.

तेलंगणातील सिंचन विभागामध्ये काम करणाऱ्या एका कार्यकारी अभियंत्याने भ्रष्टाचार करून मोठी संपत्ती जमा केली होती. मात्र याची कुणकूण लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीला लागली आणि एसीबीच्या पथकाने मंगळवारी कार्यकारी अभियंते नुने श्रीधर यांच्याशी संबंधित 13 ठिकाणावर छापे टाकले. या छापेमारीदरम्यान नुने श्रीधर यांनी मोठे घपले करून संपत्ती जमवल्याचे समोर आले. या प्रकरणी नुने श्रीधर यांना अटकही करण्यात आली आहे.

एसीबीच्या छापेमारीमध्ये नुने श्रीधर यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रातापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली. हैदराबादमधील आलिषान इमारतीतील 4500 चौरस फुटांचा फ्लॅट, करीमनगरमधील तीन फ्लॅट, यासह हैदराबादजवळील तेल्लापूर येथे एक व्हिला, वारंगल, करीमनगर आणि हैदराबाद येथे तीन इमारती, तसेच 19 भूखंड, 16 एकर बागायती जमीन ही कोट्यवधींची स्थावर मालमत्ता आणि करीमनगरमधील अनेक हॉटेल्समध्ये त्यांची भागिदारी असल्याचे चौकशीत समोर आले. यासह रोख रक्कम, दागिने आणि बँकेतील ठेवी यांचीही गणना सुरू आहे. तसेच त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न थायलंड येथे केले आणि यावरही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे.

आरोपी श्रीधर हे कलेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्टमध्ये कार्यरत होते. हा प्रोजेक्टच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असून तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनाही या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या नुने श्रीधर यांच्याकडे आता डोळे दिपवणारी संपत्ती सापडली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे.