निवडणुका केवळ घोषणा देऊन जिंकता येत नाहीत. प्रत्यक्ष मतदानाने त्या जिंकाव्या लागतात. जर निवडणुका जिंकायच्या असतील तर मतदार यादी सक्षम असली पाहिजे. त्यासाठी जिल्हाप्रमुखांपासून ते बूथप्रमुखांनी त्यांच्यावर सोपवलेली कामे चोख पार पाडावी, अशा सूचना शिवसेना पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केल्या.
जिल्हाप्रमुखांपासून ते बूथप्रमुखांनी आपापल्या मतदारसंघात काम करून त्याचा अहवाल संपर्कप्रमुखांकडे द्यावा. मतदार यादीतील नावे गाळली जाऊ नये यासाठी प्रत्येक मतदार यादीसाठी एक बूथप्रमुख, पोलिंग ऐजंट नेमावा. मतदार यादी वाचून दुबार, बोगस मतदार नोंदणीबाबत 21 ऑगस्टपूर्वी आक्षेप घ्यावे. बूथ ऐजंट निवडून त्यांची नावे, कागदपत्रे निवडणूक अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयात द्यावी, अशा सूचना राऊत यांनी केल्या.
वाजतगाजत, जबरदस्त उत्साहाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जयजयकार करत भगवा सप्ताह साजरा करावा. हा सप्ताह विधानसभा निवडणुकीपुरताच मर्यादित न ठेवता पुणे महानगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कायम सुरू ठेवावा, असा सूचना राऊत यांनी दिल्या.