
20 हजारांत खरेदी करून तब्बल 21 लाखांना व्हिंटेज कारची विक्री उत्पन्नात मोडत असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत या उत्पन्नावर कर आकारणी करण्याचा अपील न्यायाधीकरणाचा निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
नरेंद्र बुवा यांनी ही याचिका केली होती. बुवा यांनी विक्री केलेल्या व्हिंटेज कारची रक्कम उत्पन्नात येत असल्याचे कर अधिकाऱ्याने सांगितले. कर आयुक्तांनी हा निष्कर्ष अयोग्य ठरवला. अपील न्यायाधीकरणाने कर आयुक्तांचा निकाल रद्द केला. व्हिंटेज कारची विक्री उत्पन्नात मोडते, असा निर्णय न्यायाधीकरणाने दिला. याविरोधात बुवा यांनी याचिका केली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
हौशेसाठी कार घेतली
बुवा हे नोकरदार आहेत. त्यांनी ही कार हौशेसाठी घेतली होती. त्यांच्या घराजवळ ही कार पार्क केली जात नव्हती. त्यांनी या कारच्या देखभालीसाठी खर्च केलेला नाही. ते कामाला जाण्यासाठी ऑफिसच्या कारचा वापर करायचे. परिणामी या व्हिंटेज कारच्या विक्रीतून मिळालेली रक्कम उत्पन्न असल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.