#CAA उत्तर प्रदेशात प्रचंड हिंसाचार; बिहारमध्ये कडकडीत बंद, दिल्लीत तणाव कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशाच्या अनेक भागात उसळलेला आगडोंब दिवसेंदिवस वाढतच आहे. उत्तर प्रदेशात प्रचंड हिंसाचार सुरू असून, पोलीस गोळीबारात दोन दिवसांत मृतांची संख्या 16 वर गेली आहे. या हिंसाचारात 263 पोलीस जखमी झाले आहेत. बिहारमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. रेल रोको आणि रास्ता रोको करण्यात आले. राजधानी दिल्लीतही आंदोलन सुरू आहे.

लखनौ, अलाहाबाद, कानपूर, रामपूर, अलिगढ, काशीगंज, सहारणपूरसह राज्यातील बहुतांशी जिल्हय़ात प्रचंड तणाव आहे. अनेक शहरांमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहे. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. शाळा-कॉलेज बंद आहेत. कानपूरमध्ये पोलीस चौकी जाळली. अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या. मोर्चेकऱयांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात 13 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडीत लाठीमार केला. उत्तरप्रदेशात दोन दिवसांत गोळीबारात मृतांची संख्या 16वर गेली आहे. 705 लोकांना अटक करण्यात आली असून, 4500 जणांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचार भडकविणाऱया 14 हजारांवर पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. 102 जणांना अटक केली आहे. 263 पोलीस जखमी झाले असून, 57 पोलीस गोळीबारात जखमी झाल्याची माहिती उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक प्रविणकुमार यांनी सांगितले.

भाजप तीन कोटी कुटुंबांना समजवणार
नागरिकता सुधारणा कायद्याबद्दल अजूनही देशातील बहुतांश लोकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज आहेत. या कायद्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढील दहा दिवस मोहीम राबवणार आहे. सुमारे तीन कोटी कुटुंबांपर्यंत या कायद्याची माहिती पोहचवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्याबरोबरच 250 पत्रकार परिषदा आणि सभांच्या माध्यमातूनही या कायद्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

‘एनडीए’ची बैठक बोलवा
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) तातडीची बैठक बोलवण्यात यावी, अशी मागणी जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

सोनिया, राहुल यांचे आज धरणे
काँग्रेस पक्षाच्या वतीनेही रविवार, 22 डिसेंबरला दिल्लीतील राजघाट येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेश
राज्यभरात तीन हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. लखनौमध्ये 219, भदोहीत 24 जणांना अटक करण्यात आली.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये 600 हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र
हिंगोली येथे शुक्रवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी 130 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून 20 जणांना अटक करण्यात आली आहे.