
सामना ऑनलाईन । नांदेड
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुणेगाव व आमदुरा येथील कार्यकर्त्यांनी गोदावरीत जलसमाधी घेण्याची घोषणा केल्यानंतर आज नांदेड पोलिसांनी याठिकाणी कमालीचा बंदोबस्त लावला होता. मात्र जमावाने पोलिसांच्या तीन गाड्यांवर दगडफेक केल्याने व त्यात पाच ते सहा कर्मचारी जखमी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी फायर रबर गोळ्यांचा पाचवेळा गोळीबार करुन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्रूधुरांच्या नळकांड्याचाही वापर करण्यात आला. पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले असून, तेथील परिस्थिती तणावाखाली असली तरी नियंत्रणात आहे.
शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील मुदखेडजवळील पुणेगाव व आमदुरा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. संभाजीनगर जिल्ह्यातील प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व त्यांच्या सर्व सहकार्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गावाच्या सीमेपासून ते गोदावरी नदीचा पुल संपेपर्यंत तसेच आजूबाजूच्या शिवारात देखील बंदोबस्त लावण्यात आला होता. यात जीवरक्षक दलांचाही समावेश होता. आमदुरा व पुणेगाव येथून घोषणाबाजी करीत नदीच्या दोन्ही दिशेने जमाव येत असताना या जमावाने पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. यात पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले.
आवाहन करुन सुध्दा जमाव ऐकत नसल्याने सुरुवातीला अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडण्यात आल्या, त्यानंतरही जमावावर नियंत्रण येत नसल्याने पोलिसांनी पाच रबर हवेत फायर करुन जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. यावेळी वीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमध्ये दोन नागरिकांनाही किरकोळ मार लागल्याचे वृत्त आहे. जमावाने पोलिसांच्या ३ गाड्यांना लक्ष्य केले. पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, “सुरुवातीला तणाव निर्माण झाल्याने आम्हाला अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर त्यानंतर रबर फायर करण्यात आले. जमावाने पोलिसांच्या गाड्याही फोडल्या. सध्या परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.”



























































