मराठवाड्यात आंदोलनाला हिंसक वळण; कळमनुरीत पोलिसांवर पेट्रोलबॉम्ब फेकले

728

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात परभणी, हिंगोली तसेच बीड येथे हिंसक वळण लागले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी येथे संतप्त जमावाने पोलिसांवर पेट्रोलबॉम्ब फेकले, बस पेटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परभणीत जमावाने दिसेल त्या वाहनाची तोडफोड केली. येथे जमावाच्या दगडफेकीत तहसीलदार जखमी झाले. बीडमध्ये जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. संभाजीनगरात वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी एकत्र येऊन या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढला.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात शुक्रवारी आंदोलनाचे रान पेटले. हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत येथे मोर्चा काढण्यात आला. हिंगोलीत आंदोलकांनी मानव विकास मिशनच्या बसवर दगडफेक केली. त्यानंतर हिंगोली आगारातून एकही बस बाहेर काढण्यात आली नाही. कळमनुरीत या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सकाळी 7 वाजता बसस्थानकावरून निघालेल्या दोन बसवर जमावाने तुफान दगडफेक केली. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर संतप्त जमावाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक केली. कापसे कॉर्नर, नवी आबादी, पोस्ट ऑफीस परिसर, नाईकवाडी मोहल्ला या भागात जमावाने पेट्रोलबॉम्ब फेकले. दुपारी 4 वाजता रजा मैदान परिसरातून पोलिसांना पिटाळून लावण्यात आले. दुकाने तसेच खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. कळमनुरीहुन उमरखोजाकडे जाणारी बस पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवून आग आटोक्यात आणली. जमावाने केलेल्या दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले. कळमनुरीतील हिंसाचाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक योगेशकुमार, डीवायएसपी यांनी कळमनुरी गाठली. समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 11 नळकांड्या फोडल्या. सध्या शहरात तणाव असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

कळमनुरी शहरामध्ये समाजकंटकांनी घातलेल्या हैदोसामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. नांदेडहून कळमनुरीत प्रवेश करतांना अ‍ॅड. मनोज देशमुख यांच्या कारवर समाजकंटकांनी तुफान दगडफेक केली. अ‍ॅड. देशमुख यांनी वाहनातून उतरत पोलिसांची मदत घेतल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले. कळमनुरीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. कळमनुरी शहरासह हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केले आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला संपर्क साधून समाजकंटकांवर कारवाई करावी, असे आदेश दिल्याची माहिती आमदार बांगर यांनी दिली.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध पक्ष व संघटनांच्या वतीने धरणे धरण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंबेडकर आणि फुलेंच्या देशात हुकूमशाही सहन करणार नाही, एकता का राज चलेगा, हिंदू-मुस्लिम साथ चलेगा, अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेवून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले होते. यासोबतच मुदखेड तहसीलवर कार्यालयावर हजारो नागरिकांनी मोर्चा काढला होता. नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात पुकारलेल्या बीड बंदला काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला, गेवराई, माजलगावात बंद पाळण्यात आला. बीडच्या शिवाजी चौकात दगडफेक करून बस फोडण्यात आली. तसेच पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी तातडीने दंगलनियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. व जमाव पांगवण्यात आला.

नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात परभणी शहरात ईदगाह मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. जिल्हा रुग्णालय, सुभाष रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशनरोड या मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला. येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पत्रकार भवनसमोर जमावाने दगडफेक सुरू केली. त्यामुळे तणाव निर्माण झाले. मोर्चेकरी पांगत असतानाच पुन्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या तोंडावरच दगड बसला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या