परभणीत नागरिकता कायद्याला कडाडून विरोध; वाहनांवर दगडफेक, तहसीलदार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात नागरिकता कायद्याला कडाडून विरोध होत आहे. परभणीत या कायद्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी मुस्लिम समाजासोबत अनेक नागरिक रस्त्यावर उतरले. परभणी शहरात सकाळपासूनच बाजारपेठ, विविध रस्ते, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी, अनेक अ‍ॅटो रिक्क्षा व अन्य वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. आंदोलकांचा दगड लागल्यामुळे परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर किरकोळ जखमी झाले. यावेळी पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता.

नागरिकता कायद्याच्या विरोधात शुक्रवारी परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर प्रचंड जनसमुदायाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात समाजातील सर्व घटकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यादरम्यान मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करून अग्निशमन दलाची एक गाडी फोडली. तसेच पेढा हनुमान येथील अ‍ॅड. अशोक सोनी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. परभणी शहरासह पालम, गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या शहरात देखील कडकडीत बंद पाळून नागरिकता कायद्याचा निषेध व्यक्त केला. या बंदचा परिणाम एसटी महामंडळावर देखील झाला असून सर्व बससेवा ठप्प आहे.

शहरातील ईदगाह मैदानावरून निघालेला हा मोर्चा जिल्हा रुग्णालय, सुभाष रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशनरोड या मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर शेकडो युवकांनी रस्त्यावर ठाण मांडले. अनेक गाड्या थांबवून रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ तणाव पसरला होता. मोर्चा दरम्यान शहरातील पत्रकार भवनसमोर काही मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला शांत करण्याच्या प्रयत्नात असलेले तहसीलदार विद्याचरण कडवकर त्यात जखमी झाले. तसेच चार ते पाच पोलिसांना किरकोळ मार लागला. त्यानंतर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी तातडीने हजर झाले. त्यानंतर आंदोलनकर्ते पांगले परंतु जाताजाता आंदोलनकांनी 10 ते 12 दुचाकी गाड्यांवर दगडफे करत गाड्या ढकलून दिल्या. तसेच 4 ते 5 चारचाकी वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगीतले. सायंकाळी उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. तसेच सीसी टीव्ही फुटेज तपासून ज्या आंदोलनकांनी गैरवर्तन करीत दगडफेक केली, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही पोलीसांनी सांगितले.