
सामना प्रतिनिध । कन्नूर
शबरीमाला मंदिरात घुसून दोन महिलांनी भगवान अय्याप्पा यांचे बुधवारी दर्शन घेतल्याच्या विरोधात संघ-भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी छेडलेल्या हिंसक आंदोलनाला आता भाजप आणि सत्ताधारी माकप यांच्यातील रस्त्यावरील संघर्षाचे रूप प्राप्त झाले आहे. त्यातून एकमेकांच्या नेत्यांच्या घरांवर बॉम्बहल्लेही सुरू झालेत. त्यामुळे कन्नूर जिह्यात आगडोंब पेटला आहे.
मडापीडीकाईल येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए. एन. शमसीर, वाडिईल पीडिका येथे भाजपचे राज्यसभेतील खासदार व्ही. मुरलीधरन आणि थलासरी येथे माकपचे माजी जिल्हा सरचिटणीस पी. सासी या नेत्यांच्या घरांवर शुक्रवारी रात्री बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत, तर परीयारम या भागात शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय पेटवून देण्यात आले. मात्र बॉम्बहल्ले आणि जाळपोळीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
माकपचे नेते शमसीर आणि सासी यांच्या घरांवर बॉम्बहल्ले झाल्यानंतर काही तासांतच भाजपचे खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या वडिलोपार्जित घरावर बॉम्बहल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे शांततेसाठी संघ-भाजप आणि माकप नेत्यांची संयुक्त बैठक होत असतानाच हा हिंसाचार उफाळला. त्यामुळे कन्नूर जिह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून तणाव पसरला आहे. पेरूम्बरा येथे माकपच्या एका कार्यकर्त्यावर तर थलासरी येथे संघाच्या एका नेत्यावर शुक्रवारी रात्री हल्ला करण्यात आला. संघनेत्याच्या घरावरही हल्ला करून तोडफोड करण्यात आली.























































