
आपल्या सध्याच्या खाद्यसंस्कृतीचा एक मोठा भाग म्हणजे स्ट्रीट फूड. स्वच्छता, आरोग्य यांविषयी कुणी कितीही सल्ला दिला तरी स्ट्रीट फूडचा चाहतावर्ग काही कमी होत नाही. त्यामुळे नेहमीपेक्षा हटके पदार्थ लोकांना खाऊ घालण्याची अहमहमिका अशा स्टॉलमालकांमध्ये लागते. त्यातून काही भन्नाट पदार्थ बनतात. सध्या असाच एक भन्नाट पदार्थ व्हायरल होत असून तो पाहून भुकेऐवजी नेटकरी खवळले आहेत.
हा पदार्थ आहे भजी. आता भजी हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर कांदा, बटाटा, कोबी, पालक असे पदार्थ येतात. पण, कुणी गुलाबजामच्या भज्या बनवल्या तर? कल्पना पण करता येत नाही, अशी गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. एका स्ट्रीट फूड स्टॉलवर गुलाबजामच्या भज्या तळण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत मॅगी या पदार्थावर सर्वाधिक प्रयोग करण्यात आले आहेत. पण, आता प्रयोगशील मंडळींनी आपला मोर्चा अन्य पदार्थांकडे वळवला आहे. त्यात त्यांनी हा पदार्थ तयार करण्याचं धाडस केलं आहे. या धाडसी प्रयोगाचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भजी तळणारा माणूस आधी बेसनाच्या पीठ कालवून भज्यांचं आवरण तयार करतो. त्यात तो गोडसर असे गुलाबजाम घोळवून घेतो आणि तेलात तळायला सोडतो.
हा व्हिडीओ पाहून खवय्यांच्या भुकेऐवजी जीव खवळला आहे. असा भीषण प्रयोग का केला जातोय, हे अत्याचार थांबवा, असं करणाऱ्याला देव माफ करेल पण आम्ही करणार नाही, अशा शेलक्या भाषेत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram





























































