नो बॉलचा वाद : विराट कोहलीने केली पंचांना शिवीगाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

गुरुवारी झालेल्या मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. या शेवटच्या चेंडूवर सामना संपल्यानंतर मोठा वाद झाला असून त्या वादानंतर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पंचांच्या खोलीत जाऊन त्यांना शिवीगाळ केल्याचे समजते. विराट कोहलीच्या या वर्तणूकीवरून त्याला दंड होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

सामन्याच्या शेवटच्या चेंडूनला बंगळुरूला विजयासाठी एका चेंडूत सात धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाज श्रेयस दुबे मैदानावर होता. लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर श्रेयसने फटका मारला मात्र त्याला एकच धाव घेता आली व तो सामना मुंबईने जिंकला. मात्र मलिंगाचा शेवटचा चेंडू हा नो बॉल होता हे पंचांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर या नो ब़ॉलवरून वाद निर्माण झाला. विराट कोहलीने मॅचच्या पुरस्कार सोहळ्यात देखील याबाबत सांगून त्याचा राग व्यक्त केला. ”आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सामना खेळत होतो. कुठल्या क्लबचा हा सामना नव्हता. पंचांनी त्यांचे डोळे उघडे ठेवून त्यांचे काम केले पाहिजे. हा खूप विचित्र प्रकार होता.” अशा शब्दात त्याने त्याचा राग व्यक्त केला.

मात्र विराट त्यानंतरही शांत नाही झाला. त्याने थेट पंचाच्या खोलीत घुसून त्यांच्यावर मोठ्या मोठ्याने ओरडत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असेल जिथे एखादा खेळाडू पंचांच्याच खोलीत जाऊन त्यांना ओरडतो.