ICC T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विराट कोहली का नाही दिसला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरीमुळे ICC T20 World Cup वर एकूण तिसऱ्यांदा तर सलग दुसऱ्यांदा हिंदुस्थानने नाव कोरले आहे. हा सामना याची देही याची डोळा पाहण्या टीम इंडियाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा उपस्थित होते. यावेळी विराट कोहली याची अनुपस्थिती मात्र सर्वांना खटकली. कोणत्या कारणामुळे विराट कोहली इथे दिसला नाही अशी चर्चा रंगली आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक क्षणी अनेक विक्रमांची नोंद झालीच, पण या सोहळ्याला ‘चार चाँद’ लावले ते हिंदुस्थानचे दोन माजी विश्वविजेते कर्णधार—महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीने. हे दोन्ही दिग्गज व्हीआयपी बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद लुटताना दिसले. रोहित आणि धोनीला एकत्र पाहून चाहते सुखावले असले, तरी हिंदुस्थानी क्रिकेटचा आणखी एक आयकॉन विराट कोहली तिथे नसल्याने अनेकांची निराशा झाली.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली असली, तरी रोहित आणि विराट अजूनही एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. तरीही, धोनी आणि रोहित सामन्याला उपस्थित राहिले असताना विराट कोहलीची अनुपस्थिती अनेकांसाठी कोडं ठरली.

विराट कोहली विश्वचषकाच्या फायनलला का उपस्थित राहिला नाही?

विराट का आला नाही, याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यामागे दोन प्रमुख कारणे समोर येत आहेत.

एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे ‘माजी विश्वविजेते कर्णधार’ म्हणून या फायनलला अधिकृत क्षमतेने उपस्थित होते. धोनीने २००७ मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले होते, तर रोहितने २०२४ मध्ये बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून तो पराक्रम पुन्हा करून दाखवला होता. याउलट, कोहलीने कर्णधार म्हणून टी-२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे, अधिकृत प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमात त्याची कोणतीही विशेष भूमिका नव्हती.

तसेच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे सोडले नसले तरी, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे (बातमीनुसार) त्याला कुटुंबासोबत घालवण्यासाठी आता अधिक वेळ मिळतो. एका जुन्या मुलाखतीत विराटने म्हटले होते की, एकदा का मी निवृत्त झालो की मी काही काळ कोणालाही दिसणार नाही.

‘एकदा माझे क्रिकेट संपले की मी निघून जाईन, तुम्ही मला काही काळ पाहू शकणार नाही (हसून). जोपर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत मला माझे सर्वस्व झोकून द्यायचे आहे, आणि तीच गोष्ट मला पुढे नेत आहे,’ असे तो म्हणाला होता. हिंदुस्थान संघातील आपली टी-२० कारकीर्द संपलेली असताना, विराटने घरी राहून आपल्या मित्र-परिवारासह सामन्याचा आनंद घेणे आणि संघाच्या यशाचा जल्लोष करणे पसंत केले असावे.